चित्रकारांच्या कुंचल्यातून कोकणचे सौंदर्य!
By admin | Published: December 14, 2015 11:53 PM2015-12-14T23:53:01+5:302015-12-15T00:25:51+5:30
‘कोकण कट्टा’चा उपक्रम : चित्रकारांना व्यासपीठ देण्याबरोबरच कोकणच्या पर्यटन विकासाचा हेतू
चिपळूण : कोकणातील अभिजात सौंदर्याची सर्वांनाच भुरळ पडते. कोेकणचे हे सौंदर्य पाहण्यासाठी देश- विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने यावेत व त्यातून कोकणचा पर्यटन विकास साधला जावा. यासाठी कोकणचे हे सौदर्यं व्यावसायिक चित्रकार, कलावंताच्या कुंचल्यातून रेखाटून ते मोठ्या शहरातील प्रदर्शनांमध्ये मांडून पर्यटकांना कोकणाकडे आकर्षित करणे व कलावंताना मोठे व्यासपीठ मिळवून देणे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून पेढे परशुराम परिसरात व परशुराम घाटात राज्यभरातील नामवंत व्यावसायिक चित्रकारांनी या परिसरातील विविध ठिकाणची निसर्गचित्रे काढली. परशुराम घाट व परिसरात चित्रकारांनी रेखाटलेली चित्रे पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.
गुहागरमधील पालशेत गावचे सुपूत्र अजित पितळे यांनी सोळा वर्षापूर्वी कोकणच्या विकासाचा ध्यास घेऊन मुंबईत विलेपार्ले येथे ‘कोकण कट्टा’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा १६ वा वर्धापन दिन असल्याने त्याचे औचित्य साधून संस्थेने कोकणातील विविध निसर्गस्थळांचा कुंचल्यातून अविष्कार घडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यासाठी मुंबईतील नामवंत व्यावसायिक चित्रकार जितेंद्र गायकवाड, तुषार कदम यांच्या मदतीने या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
संस्थेचे कोकणातील समन्वयक सुमंत भिडे (मळण - गुहागर) व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे यांनी कोकणातील निसर्गचित्र रेखाटनासाठी चिपळूण तालुक्यातील पेढे - परशुराम परिसराची निवड केली.
परशुराम घाटातून दिसणारे चिपळूण शहराचे विहंगम दृश्य, वाशिष्टी नदी व परिसर, परशुराम मंदिर व त्याचा परिसर आदी विविध ठिकाणची सुमारे पंचवीस चित्रे रेखाटण्यात आली. या उपक्रमाची सुरूवात परशुराम येथे अभय सहस्त्रबुध्दे यांच्या निवासस्थानी करण्यात आली. कलावंतांच्या हस्तकौशल्यातून साकारणारी चित्रे पाहताना चिपळूणकरांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता.
त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्ताजी कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बोरकर, जिल्हा परिषद सदस्य विश्वास सुर्वे, संस्थेचे अध्यक्ष अजित पितळे, सुमंत भिडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमात राज्यभरातील सुमारे २२ नामवंत व्यावसायिक चित्रकार सहभागी झाले होते.
परशुराम - पेढे परिसरातील हा निसर्गचित्र रेखाटन उपक्रम दिवसभर सुरु होता. या रेखाटन उपक्रमाचा समारोप पेढे येथील आर. सी. काळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात आला. यावेळी मान्यवर व चित्रकार उपस्थित होते. त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉ. मंदार आठवले, डॉ. बाळासाहेब ढेरे, अभय सहस्त्रबुध्दे यांचे विशेष सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)
विविध ठिकाणी उपक्रम : आरे - वारे येथील ग्रामस्थांची मागणी
कोकणातील हे अभिजात सौंदर्य कुंचल्यातून कागदावर उतरवून त्याची मोठमोठ्या शहरांतून प्रदर्शने भरवली जाणार आहेत. त्यामुळे पर्यटन विकास तसेच कलाकारांनाही संधी व व्यासपीठ मिळणार आहे. यापुढे कोकणातील विविध ठिकाणी हा उपक्रम राबविला जाणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील आरे - वारे या गावातूनही ग्रामस्थांनी अशा उपक्रमाची मागणी केली आहे. सिंंधुदुर्गपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे, असे सांगितले.
- अजित पितळे, अध्यक्ष, कोकण कट्टा
संस्थेतर्फे सिंधुदुर्गातही उपक्रम राबविणार.
गुहागर - पालशेत येथील अजित पितळे यांची संकल्पना.
कोकणचे निसर्गसौंदर्य दूरवर पोहचवण्याचा ध्यास.
डोळ्यांचे पारणे फिटले
‘कोकण कट्टा’च्या उपक्रमात मुंबईतील नामवंत कलाकारांनी आपल्या हस्तकौशल्यातून कोकणचे सौंदर्य कागदावर रेखाटले होते. ही चित्रे पाहून परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांचे जणू पारणेच फिटले. कलावंतांनी रेखाटलेल्या या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.