प्रसिद्धी नसल्यानेच ‘भुदरगड’चे ठेवीदार अनभिज्ञ
By admin | Published: December 25, 2014 12:46 AM2014-12-25T00:46:53+5:302014-12-25T00:48:12+5:30
पत्रव्यवहारच नाही : प्रसारमाध्यमांवर अवलंबून
कोल्हापूर : भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या अवसायक मंडळाने ठेवींबाबत थेट ठेवीदारांशी पत्रव्यवहार केला नसल्यानेच प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले. प्रसारमाध्यमांवरच अवसायक मंडळ थांबल्याने बहुतांश ठेवीदार अनभिज्ञ असून, बहुतांश ठेवीदारांच्या रकमा अल्प असल्याने त्यांनी पाठ फिरवली.
भुदरगड नागरी पतसंस्था अवसायनात निघाली. लाखापेक्षा अधिक ठेवीदार आणि तेवढीच कर्जदारांची संख्या होती. संस्था अवसायनात निघाल्यानंतर ठेवीदार संघटनेने ठेवी परत देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार न्यायालयाने दहा हजारपर्यंतच्या ठेव परतावा सुरू केला होता. ८१ हजार ठेवीदारांपैकी केवळ १५ हजार ठेवीदारांनी आपले पैसे परत घेतले. गेले चार-पाच वर्षे हेलपाटे मारून पैसे मिळाले नाहीत म्हटल्यावर अनेकांनी पैशाची आशा सोडून दिली आहे. त्यात ठेवीची रक्कम दीड-दोन हजार रुपये असल्याने त्यासाठी कोणाच्या मागे लागायचे? असाही ठेवीदारांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. दहा-पंधरा वर्षांपूर्वीच्या ठेवी असल्याने अनेकांजवळ पासबुक अथवा ठेवीची पावती नसल्यानेही अडचणी निर्माण झाल्या आहेत. हे जरी खरे असले तरी पतसंस्थेच्या अवसायक मंडळाने संबंधित ठेवीदारांपर्यंत पोहोचणे गरजेचे होते. केवळ प्रसारमाध्यमातून ठेवीदारांना आवाहन केल्याने अनेक ठेवीदार अनभिज्ञ राहिलेले आहेत. परिणामी, दहा हजार रुपये पर्यंतच्या ठेवींना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यासाठी ठेवीदारांच्या पत्यावर पत्रव्यवहार करणे गरजेचे आहे. तसे केले तर बहुतांश ठेवींचा प्रश्न मार्गी लागू शकतो.
ठेवी परत मिळाव्यात म्हणून जनहित याचिका दाखल करून हा प्रश्न मार्गी लावला; पण त्याला प्रतिसाद मिळत नाही. जुने ठेवीदार असल्याने काहीजण अशिक्षित आहेत. वृत्तमान पत्रात आलेले त्यांना समजत नाही. यासाठी त्यांनी पत्रव्यवहार करणे गरजेचे आहे.
- दादासाहेब जगताप (जिल्हाध्यक्ष, ठेवीदार संघटना)
ठेवीला प्रतिसाद मिळत नाही, हे खरे आहे. दोन हजार रुपयांच्या ठेवींची संख्या जास्त असल्याने ती नेण्यासाठी कोणी येत नाही. अनेक वेळा ठेवीदारांना विविध माध्यमातून आवाहन केले आहे. आता पत्रव्यवहाराच्या माध्यमातून थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न राहणार आहे.
- ए. जी. नाईक
(व्यवस्थापक, भुदरगड पतसंस्था)