समाजकारण्यांपुढेच नतमस्तक व्हा..!

By admin | Published: March 29, 2017 01:10 AM2017-03-29T01:10:29+5:302017-03-29T01:10:29+5:30

जयसिंगराव पवार : शांतिनिकेतनमध्ये पी. बी. पाटील, सरोजताई पाटील स्मृती संग्रहालयाचे अनावरण

Become a masterpiece towards society! | समाजकारण्यांपुढेच नतमस्तक व्हा..!

समाजकारण्यांपुढेच नतमस्तक व्हा..!

Next



सांगली : सत्ताधारी राज्यकर्ते, श्रीमंतांपुढे नतमस्तक होण्याऐवजी, समाजकारणाने प्रेरित व्यक्तींचा आदर्श तरुणांनी घेतला पाहिजे, त्यांच्यापुढे नतमस्तक झाले पाहिजे, तरच भविष्यातील तरूण पिढी जागृत होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले.
सांगलीतील शांतिनिकेतनमध्ये प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील व प्राचार्या सरोजताई पाटील यांच्या अर्धपुतळ्यांचे व स्मृती संग्रहालयाचे अनावरण मंगळवारी झाले. यावेळी डॉ. पवार बोलत होते. माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम, आमदार जयंत पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आ. विलासराव पाटील-उंडाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, दीपक दळवी, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, स्वातंत्र्यसेनानी जयराम कुष्टे, माधवराव माने, कुंतिनाथ करके, डॉ. विश्वजित कदम, अ‍ॅड्. किसन एळ्ळूरकर, कुमार देसाई आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. पवार म्हणाले की, प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील आणि प्राचार्या सरोजताई पाटील या दोघांचेही समाजकारण, शिक्षण, प्रबोधनामध्ये मोठे काम आहे. पी. बी. तर उत्तम शाहीर, प्रबोधनकार आणि राजकारणी होते. राज्यातील गावे बळकट करण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र आणि देशालाही त्यांनी दिशा दिली होती. पंचायत राज व्यवस्था बळकट करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी हाती घेऊन, ते सरकारला अमलात आणण्यासाठीही भाग पाडले. ‘नवे गाव आंदोलना’तून तरूणांना वेगळी ऊर्जा मिळाली. या समाजकारणाचा आदर्श तरूण पिढीने घेतला पाहिजे, त्यांच्यापुढे नतमस्तक झाले पाहिजे. तरूण पिढीसाठी पी. बी. पाटील यांचे स्मृती संग्रहालय प्रेरणादायी ठरणार आहे.
गौतम पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, बापूसाहेब पुजारी, हौसाताई पाटील, दीपक शिंदे-म्हैसाळकर, अभिजित पाटील, डॉ. प्रताप पाटील आदी उपस्थित होते. विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
समाजकारणाचा इतिहास जपणे गरजेचे
डॉ. पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर प्रचंड मोहिमा हाती घेऊन पाचपट राज्याची निर्मिती केली. परंतु, याबद्दल आपणास फारशी माहितीच नाही. राजांनी तापीपासून कावेरीपर्यंत राज्याचा विस्तार केला होता. ७० हजार सैनिकांची फौज आणि वीस हजार कारकुन बरोबर घेऊन गेले होते. परंतु, या कारकुनांनी शिवाजी महाराजांबद्दल हस्ताक्षरात एकही नोंद ठेवली नाही. इंग्रजांनी मात्र याबाबत लिहिले असून, आमच्या बापजाद्यांनी काहीच नोंदी ठेवल्या नाहीत. राजर्षी शाहू महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याबाबतही तीच परिस्थिती आहे. यामुळे इतिहासाचे मोठे दुवे दुर्लक्षित राहिले आहेत. पूर्वीच्या चुका लक्षात घेऊन आजच्या पिढीने तरी थोरांच्या इतिहासाच्या नोंदी जतन करून ठेवल्या पाहिजेत. अमेरिकेत प्रत्येक गावामध्ये एक स्मृती संग्रहालय असून तेथे समाजकारण करणाऱ्यांचा इतिहास जपून ठेवला आहे. याच धर्तीवर आपणही स्मृती संग्रहालये जतन करून ठेवली पाहिजेत.

Web Title: Become a masterpiece towards society!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.