कोल्हापूरच्या विकासासाठी एक व्हा

By Admin | Published: October 8, 2016 12:58 AM2016-10-08T00:58:52+5:302016-10-08T01:03:37+5:30

संभाजीराजे छत्रपती : क्रिडाई कोल्हापूरच्या ‘गृह-दालन २०१६’चा उत्साहात प्रारंभ

Become one for the development of Kolhapur | कोल्हापूरच्या विकासासाठी एक व्हा

कोल्हापूरच्या विकासासाठी एक व्हा

googlenewsNext

कोल्हापूर : माझं-तुझं करण्याऐवजी राजकीय नेत्यांसह सर्वांनीच संघटित होऊन कोल्हापूरच्या विकासासाठी वेगळा विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी येथे केले.
क्रिडाई कोल्हापूरतर्फे आयोजित ‘गृह-दालन २०१६’ या गृहविषयक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येथील शाहूपुरी जिमखाना मैदानावरील कार्यक्रमास ‘क्रिडाई महाराष्ट्र’चे उपाध्यक्ष राजीव परीख, उद्योगपती व्ही. बी. पाटील प्रमुख उपस्थित होते. उत्साही वातावरणात ‘गृह-दालन २०१६’चा प्रारंभ झाला.
खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ‘स्मार्ट सिटी’ योजनेमध्ये कोल्हापूरचा पहिल्याच टप्प्यात का समावेश झाला नाही, याच्या संशोधनाची आवश्यकता आहे. राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, महापालिका, क्रिडाई कोल्हापूर, पर्यावरणप्रेमी, आदी घटकांनी संघटित होऊन कोल्हापूरच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूरच्या समावेशासाठी सर्व मिळून एकत्रितपणे प्रयत्न आणि आवश्यक स्वरूपातील आराखडा निश्चित करूया. गृहविषयक माहितीचे दालन कसे असावे, हे क्रिडाई कोल्हापूरने दाखवून दिले आहे.
‘क्रिडाई महाराष्ट्र’चे उपाध्यक्ष परीख म्हणाले, कोल्हापूरच्या ‘इमेज ब्रॅँडिंग’ची गरज आहे. शहरवासीयांनी मानसिकता बदलल्यास चांगले अधिकारी मिळतील. या दृष्टीने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेऊन बैठक घ्यावी. बांधकाम व्यवसायाला स्थिरता आली आहे. त्याला गती देण्यासाठी गृहकर्जाचे दर कमी करणे, करसवलत देणे, आदींद्वारे सरकारने पाठबळ द्यावे. दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘गृह-दालन’द्वारे कोल्हापूरकरांना त्यांचे गृहस्वप्न साकारण्याची चांगली संधी मिळाली आहे. ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष महेश यादव यांनी प्रास्ताविकात सांगितले की, कोल्हापूरच्या बांधकाम व्यावसायिकांनी विश्वासार्हता आणि गुणवत्ता जपली आहे. त्यामुळे ‘रेरा’अंतर्गत एकही कारवाई येथे झालेली नाही. प्राधिकरणाला गती मिळावी. स्मार्ट सिटीतील समावेशासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. कोल्हापूरची ओळख ही आंदोलकांचे शहर म्हणून होत आहे. ती पुसण्यासाठी ‘सिटी ब्रॅँडिंग’ची गरज असून, त्याला पाठबळ देण्याची ‘क्रिडाई कोल्हापूर’ची तयारी आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते फीत कापून ‘गृह-दालन’चे उद्घाटन करण्यात आले. यानंतर राजेश काजवे, सोपान पाटील, अमित चौगुले, मंदार आपटे, भूपेश कांजळकर, जितूभाई गांधी यांचा सत्कार करण्यात आला.
‘गृह-दालन’चे अध्यक्ष पवन जामदार यांनी प्रदर्शनाची माहिती दिली. यावेळी क्रिडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष सुजय होसमनी, सचिव विद्यानंद बेडेकर, खजानिस चेतन वसा, ‘गृह-दालन’चे खजानिस प्रकाश देवलापूरकर, सहसमन्वयक विश्वजित जाधव, संदीप मिरजकर, सचिन परांजपे, राजेश आडके, विक्रांत जाधव, प्रदीप भारमल, संग्राम दळवी, आदी उपस्थित होते. प्रदर्शनाचे समन्वयक प्रमोद साळुंखे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

आत्मपरीक्षणाची गरज
राजकीय नेते, लोकप्रतिनिधींसह सर्वजण राजर्षी शाहू महाराज, महाराणी ताराराणी यांचे नाव घेतात; पण त्यांच्या विचारांप्रमाणे कोल्हापूरच्या विकासासाठी माझ्यासह आपण सर्व कार्यरत आहोत काय, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. ते म्हणाले, लोकप्रतिनिधींनी दिल्लीत रमायचे की कोल्हापूरच्या विकासासाठी निश्चित दिशा ठरवून कार्यरत राहण्याची वेळ आली आहे. शिवाय राजकीय स्वार्थ, वैयक्तिक मते बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे.
प्राधिकरणासाठी एकत्रित यावे
कोल्हापूरचा विकास साधायचा असल्यास प्राधिकरणाला गती देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. ते म्हणाले, विकासाचे आव्हान स्वीकारण्यास मी तयार आहे. विमानसेवा लवकर सुुरू करण्यासह प्राधिकरणाबाबत मी पाठपुरावा करणार आहे.

Web Title: Become one for the development of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.