जातीच्या संकुचित धारणा सोडून माणूस बना : श्रीपाल सबनीस -पलूस येथे २९ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 01:08 AM2017-12-26T01:08:30+5:302017-12-26T01:10:34+5:30
पलूस : ग्रामीण भागातील लेखकांनी बहुसांस्कृतिक वास्तव समजून घेतले पाहिजे. संस्कृती ही मानवनिर्मित आहे. जातीच्या संकुचित धारणा सोडून माणूस बनणे गरजेचे आहे,
पलूस : ग्रामीण भागातील लेखकांनी बहुसांस्कृतिक वास्तव समजून घेतले पाहिजे. संस्कृती ही मानवनिर्मित आहे. जातीच्या संकुचित धारणा सोडून माणूस बनणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
पलूस येथे स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळ व पलूस तालुका मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २९ व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. सबनीस बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत शहासने (पुणे) उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, साहित्य म्हणजे शब्दांची आतषबाजी नाही, तर जीवनाची उपासना आहे. जीवन बदलून टाकण्यासाठी साहित्य गरजेचे आहे. साहित्यिकांनी ग्रामीण वास्तवाचे चिंतन करावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शहासने म्हणाले, ग्रामीण भागात साहित्याची ऊर्जाकेंद्रे आहेत, ती शोधली पाहिजेत. मावळतीच्या प्रकाशात उगवतीची किरणे शोधायची असतात.यावेळी दत्ता मानुगडे, डॉ. अशोक माळी, प्रा. रघुराज मेटकरी, सुनील तोरणे, विजयकुमार कुलकर्णी, वृषाली कुलकर्णी, सर्जेराव नलवडे, आर. पी. सावंत यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच प्रा. शिवाजी वरूडे व हरिभाऊ पुदाले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. संतोष काळे यांनी स्वागत केले, तर वासंती मेरू यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बी. ए. पाटील, विष्णू सिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सुहास पुदाले, पांडुरंग पुदाले, अधिकराव मोरे, शामराव डाके, वसंत आपटे, सतीश पवार, सोपान डोंगरे, उमा पुदाले यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते, साहित्यरसिक उपस्थित होते. संतोष काळे व सायली मेरू यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. संपत पार्लेकर यांनी आभार मानले.
कथाकथनाला प्रतिसाद
संमेलनाच्या दुसºया सत्रात कथाकथन पार पडले. यावेळी हिम्मत पाटील यांनी ‘माती’ ही विनोदी तितकीच हृदयस्पर्शी कथा सादर करून हास्याचे फवारे आणि अश्रूंच्या धारा यांचा मिलाफ घडवून आणला. त्यानंतर कविसंमेलन पार पडले. कवी धनदत्त बोरगावे अध्यक्षस्थानी होते.
पलूस येथील साहित्य संमेलनात डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मार्गदर्शन केले.