कोल्हापूर: गणपती विसर्जनासाठी गेलेल्या महिला व बालकांच्यावर मधमाश्यांचा हल्ला, पाचजण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 12:16 PM2022-09-06T12:16:03+5:302022-09-06T12:17:07+5:30
फटाक्याचे आवाज व धूर याने मधमाश्या पोळ्यावरून उठल्या व त्यांनी सर्व जमावावर हल्ला केला. यामध्ये आठ ते अकरा वयोगटातील चार मुले व एक महिला गंभीर जखमी झाली. या पाच गंभीरसह जमावातील ३५ जणांना मधमाश्यांनी चावा घेतला.
बांबवडे : सुपात्रे (ता. शाहूवाडी) येथील गाव तलावात गौरी व गणपती विसर्जनासाठी गेलेल्या महिला व बालकांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केल्याने चार लहान मुलांसह एक महिला गंभीर जखमी झाली.
सोमवारी गौरी-गणपती विसर्जन असल्याने सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान सुपात्रे गावातील महिला, लहान मुले यांच्यासह गावातील प्रौढ गौरी गणपती विसर्जनासाठी गावच्या तलावाच्या ठिकाणी गेले होते. यावेळी फटाक्याचे आवाज व धूर याने मधमाश्या पोळ्यावरून उठल्या व त्यांनी सर्व जमावावर हल्ला केला. यामध्ये आठ ते अकरा वयोगटातील चार मुले व एक महिला गंभीर जखमी झाली. या पाच गंभीरसह जमावातील ३५ जणांना मधमाश्यांनी चावा घेतला.
या सर्वांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बांबवडे येथे दाखल करण्यात आले. यापैकी ३५ जणांवर किरकोळ उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले, तर चार मुलांसह एक महिला यांना पुढील उपचारासाठी दाखल करून घेतले. सर्व गंभीर जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे.
ही घटना समजताच जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे, उपसरपंच अमृत पाटील, सेवा सोसायटीचे सचिव सुनील सिंघन, युवा सेना अध्यक्ष संदीप पाटील यांनी तत्काळ जखमींना मदत उपलब्ध करून दिली.