प्रारूप प्रभाग रचना करण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:18 AM2020-12-09T04:18:17+5:302020-12-09T04:18:17+5:30
कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील प्रारूप प्रभागरचना करण्याच्या कामास मंगळवारपासून सुरुवात झाली. ही निवडणूक ...
कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील प्रारूप प्रभागरचना करण्याच्या कामास मंगळवारपासून सुरुवात झाली. ही निवडणूक केव्हा होणार आहे याची निश्चित माहिती नसली तरी प्रारूप प्रभाग रचनेच्या कामास सुरुवात झाल्यामुळे पुढील महिन्याभरात निवडणुकीची घोषणा होईल, असे मानले जात आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक दि. १ नोव्हेंबरच्या दरम्यान होणे अपेक्षित होते; परंतु कोरोना संसर्गामुळे ती पुढे ढकलण्यात आली. महापालिकेवर प्रशासक म्हणून डॉ. कादंबरी बलकवडे यांची नेमणूक झाली. या आधी जून, जुलै महिन्यांत राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गर्दी होणार नाही अशा प्रकारची पूर्वतयारीची कामे करावीत, अशा सूचना यापूर्वीच दिल्या आहेत.
मागील दोन निवडणुकांतील आरक्षणासंदर्भातील सर्व माहिती संकलित केली. मात्र प्रभाग रचनेचे प्रारूप तयार केले नव्हते. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिका कार्यालयास कळवून सदरची प्रारूप प्रभाग रचना सादर करण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त, विभागीय आयुक्त या त्रिसदस्यीय समितीच्या मान्यतेनंतर राज्य निवडणूक आयोगास ११ डिसेंबरपर्यंत सदरची प्रारूप प्रभाग रचना सादर करायची आहे. या प्रारूप प्रभाग रचनेवर सूचना व हरकती मागवून प्रभाग रचना व आरक्षण ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे.
गतवेळची प्रभाग रचना कायम
विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी प्रभागाच्या हद्दी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रभागाची रचना बदलणार नाही. गत निवडणुकीत प्रभागाच्या ज्या हद्दी होत्या, त्याच यावेळीही कायम राहणार आहे. फक्त कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या हेतूने प्रारूप प्रभागरचना तयार करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत.
निवडणुकीची तयारी पुन्हा सुरू
महनगरपालिकेची निवडणूक केव्हा होणार आहे, याबाबत नेमका अंदाज कोणालाच नाही; पण ही निवडणूक मार्च, एप्रिल या महिन्यांत केव्हाही होऊ शकेल. त्यामुळे या निवडणुकीची पूर्वतयारी करण्याच्या पुन्हा एकदा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनही या कामात व्यस्त आहे. सहायक आयुक्त विनायक औंधकर हे सध्या निवडणुकीचे काम पाहत आहेत.