उन्हाळी सत्रातील परीक्षांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:39+5:302021-07-10T04:17:39+5:30
कोल्हापूर: मार्च, एप्रिलमध्ये होणाऱ्या उन्हाळी सत्रातील महाविद्यालय व पदवीत्तर ७३८ अभ्यासक्रमासाठीचे परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
कोल्हापूर: मार्च, एप्रिलमध्ये होणाऱ्या उन्हाळी सत्रातील महाविद्यालय व पदवीत्तर ७३८ अभ्यासक्रमासाठीचे परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये जमा करणे आणि त्यांनतर महाविद्यालयांनी ते विद्यापीठाकडे जमा करण्याबाबतचे तारखांचे नियोजन असणारे परिपत्रक जारी केले आहे.
त्यानुसार विद्यार्थ्यांनी शुल्कासह १४ पर्यंत, विलंब शुल्कासह १९ आणि अतिविलंब शुल्कासह २६ जुलैपर्यंत अर्ज महाविद्यायालयाकडे जमा करावयाचे आहेत. महाविद्यालयांनी हे अर्ज १७ ते २८ जुलैपर्यंत विद्यापीठाकडे पाठवावयाचे आहेत. विद्यार्थ्यांनी तत्काळ प्रवेश पात्रता पूर्ण करून परीक्षेचे अर्ज जमा करावेत, काही अडचणी असल्यास पात्रता विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठातर्फें करण्यात आले आहे.
दरम्यान, शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने ५६८ जणांनी परीक्षा दिली. ऑफलाइन फॉर्म भरलेल्यांना विद्यापीठाने फेरपरीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी ८८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती; पण प्रत्यक्षात ५६८ जणांनीच परीक्षा दिली. यात बीए, बी.कॉम, बीएससी, एमए, एमकॉम, बीबीए, बीसीए, एमसीए, एमएसडब्लूसारख्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे.