शिवाजी महाराज, ताराराणींच्या रथोत्सवाने शाहू स्मृतीशताब्दीचा प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 12:57 PM2022-04-14T12:57:19+5:302022-04-14T13:02:21+5:30
राजर्षी शाहू महाराज यांनी १९१४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व ताराराणी यांच्या रथोत्सवाचे आयोजन केले होते. छत्रपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी रथोत्सव होतो. मात्र, हे वर्षे शाहू स्मृतीशताब्दीचे असल्याने यावर्षीचे रथोत्सव हा लोकोत्सव व्हावा.
कोल्हापूर : राजर्षी शाहू स्मृतीशताब्दीची सुरुवात सोमवार (दि. १८) रात्री आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांच्या रथोत्सवाने होणार आहे. यामध्ये करवीर नगरीतील सहकारी, सामाजिक संस्थांसह तालीम मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले.
खासदार संभाजीराजे म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांनी १९१४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व ताराराणी यांच्या रथोत्सवाचे आयोजन केले होते. छत्रपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी रथोत्सव होतो. मात्र, हे वर्षे शाहू स्मृतीशताब्दीचे असल्याने यावर्षीचे रथोत्सव हा लोकोत्सव व्हावा. पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हा प्रशासनाने त्याचे नियोजन केले आहे. तरीही दख्खनचा राजा जोतिबा यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भक्तगण येतात. त्यामुळे हा सोहळा जगभरात पोहोचू शकेल. शाहू महाराजांनी सुरू केलेला रथोत्सव संपूर्ण जगात पोहोचविण्यासाठी या सोहळ्यात सामाजिक संस्था, तरुण मंडळे, तालीम मंडळांसह सगळ्या करवीरकरांनी सहभागी व्हावे.
या मार्गावरुन रथोत्सव
भवानी मंडप, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, गुजरी ते भवानी मंडप या मार्गावर रथोत्सव होणार असून, यामध्ये सामाजिक संस्था, तालीम मंडळासह शाळांनाही आवाहन करणार आहे. यानिमित्ताने करवीरकरांचा सांस्कृतिक ठेवा दाखविण्याची संधी आली असून, यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले. यावेळी ॲड. राजेंद्र चव्हाण, प्रसन्न मोहिते, फत्तेसिंह सावंत, राम यादव, उमेश पोवार, बाबा महाडिक, आदी उपस्थित होते.
खासबागमध्ये राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा
शाहू स्मृतीशताब्दीनिमित्त कोल्हापुरात ‘हिंदकेसरी’ स्पर्धेची मागणी राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार ब्रीजभूषण यांच्याकडे केली. मात्र, ‘हिंदकेसरी’चा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे कोल्हापुरात मातीतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यास मान्यता दिल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली.
राजकीय दिशा ३ मे रोजी?
राज्यसभेची मुदत ३ मे रोजी संपत आहे. त्या अनुषंगाने आपण त्या दिवशी बोलू, असे म्हटले होते. असे सांगत संभाजीराजे यांनी त्या दिवशी राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याचे संकेत दिले.