भटक्या श्वानांच्या रेबीज लसीकरणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 11:17 AM2021-02-02T11:17:36+5:302021-02-02T11:24:34+5:30
Dog Muncipal Corporation kolhapur- कोल्हापूर शहरातील भटक्या श्वानांच्या रेबीज लसीकरणाची मोहीम कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सोमवारपासून सुरू करण्यात आली. तीन पथकांनी दिवसभरात ५० श्वानांना रेबीजची लस टोचली.
कोल्हापूर : शहरातील भटक्या श्वानांच्या रेबीज लसीकरणाची मोहीम कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सोमवारपासून सुरू करण्यात आली. तीन पथकांनी दिवसभरात ५० श्वानांना रेबीजची लस टोचली.
शहरात भटक्या श्वानांची संख्या वाढली असून त्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यातच काही श्वान पिसाळतात. नागरिकांचा चावा घेऊन त्यांना जखमी करतात. गेल्या काही महिन्यांत असे प्रकार वाढल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील श्वानांवर रेबीज लसीकरण मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे. त्याचा सोमवारी प्रारंभ झाला.
महानगरपालिका आरोग्य विभागाने या मोहिमेसाठी तीन पथकांची नियुक्ती केली आहे. श्वान पकडण्याकरिता उत्तर प्रदेशातील सहा कर्मचारी मदतीला घेण्यात आले आहेत. विशिष्ट प्रकारच्या जाळीने श्वानांना पकडले जाते. त्यांना रेबीज लस टोचली जाते. जर एखादे श्वान आक्रमक असेल तर त्याला भूल देण्यात येते आणि मग लस टोचली जाते. त्यांच्या गळ्यात पट्टा घातला जात आहे.
या मोहिमेत भटक्या श्वानांची माहिती संकलित केली जात आहे. नर व मादी याची संख्या मोजली जाते. त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली की नाही हे पाहून तशी नोंद केली जात आहे. एखादे श्वान आजारी असले तर त्याला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात येते.
सोमवारी मोहिमेच्या पहिल्या दिवशी राजारामपुरी परिसरातील ५० श्वानांवर लसीकरण करण्यात आले. यावेळी सोसायटी फॉर अनिमल प्रोटेक्शन या संस्थेचे डॉ. कापडी व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. ही मोहीम महापालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबविली जात आहे.