आजऱ्यातील बंधाऱ्याचे बरगे काढण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:24 AM2021-05-21T04:24:49+5:302021-05-21T04:24:49+5:30
चार दिवसांपूर्वी पडलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हिरण्यकेशी काठावरील ११० विद्युतपंप पाण्यात बुडाले होते. बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी केल्यामुळे ...
चार दिवसांपूर्वी पडलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हिरण्यकेशी काठावरील ११० विद्युतपंप पाण्यात बुडाले होते. बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी केल्यामुळे सर्व विद्युतपंप रिकामे झाले आहेत.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हिरण्यकेशी नदी दुथडी भरून वाहण्याची ही पहिलीच वेळ आहे. अतिवृष्टीच्या पावसामुळे सर्वच बंधाऱ्यावरील शेतकऱ्यांचे विद्युतपंप पाण्याखाली गेले. किटवडे, आंबाडे या ठिकाणी बंधाऱ्यातील पाण्यामुळे शेतात पाणी घुसले. त्यामुळे शेतकऱ्यांचे ऊस पिकासह विद्युत पंपांचे २५ ते ३० लाखांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे विद्युत पंप पाण्याखाली गेल्याने व बंधाऱ्यांना असणारा धोका लक्षात घेता पाटबंधारे विभागाने तातडीने पाणी कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र कडक लॉकडाऊनमुळे बरगे काढण्यासाठी मजूर उपलब्ध होत नव्हते. अखेर तहसीलदार यांच्या मंजुरीनंतर बुधवारपासून उपलब्ध झालेल्या मजुरांकडून उचंगीवरील १०, चित्रीवरील १ व हिरण्यकेशीवरील २ असे १३ बंधाऱ्यांचे बरगे पूर्णपणे काढले आहेत.
उर्वरित ऐनापूर, भादवण, हाजगोळी, चांदेवाडी, साळगाव, देवर्डे, दाभिल, सुळेरान या बंधाऱ्यांत पाणी जास्त असल्यामुळे प्रत्येक गळ्यातील २-३ बरगे काढले आहेत. अद्यापही पाण्याचा प्रवाह जास्त आहे. हिरण्यकेशी व चित्रा नदी प्रवाहित असल्याने बरगे काढताना अडचणी येत आहेत. ३१ मेपर्यंत पाण्याची उपलब्धता पाहून टप्प्याटप्प्याने बंधाऱ्यावरील बरगे काढले जाणार आहेत. जलसंधारण विभागानेही सोहाळे, किटवडे येथील बंधाऱ्यांवरील बरगे काढण्यास सुरुवात केली आहे.
-------------------
फोटो ओळी : ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांवरील बरगे काढताना मजूर.
क्रमांक : २००५२०२१-गड-०७