तिकीट मिळवण्यापासून संघर्षाची सुरुवात
By admin | Published: September 22, 2015 12:34 AM2015-09-22T00:34:23+5:302015-09-22T00:59:34+5:30
अनेक दिग्गज इच्छुक : उमेदवार निवडताना राजकीय पक्षांची लागणार कसोटी-- प्रभाग क्रमं. ६६
प्रदीप शिंदे -- कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून स्वातंत्र्यसैनिक वसाहत प्रभाग ओळखला जातो. यंदा हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी खुला झाल्याने या प्रभागातील इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामध्ये विद्यमान नगरसेवक भूपाल शेटे यांच्या पत्नी व माजी नगरसेविका शशिकला शेटे, विद्यमान नगरसेविका जयश्री साबळे, सुहास सोरटे यांच्या पत्नी आशा सोरटे यांच्यासह रूपा निकम, शुभांगी पाटील, बकुळा कांबळे याही रिंगणात उतरल्याने प्रभागात मोठी चुरस निर्माण झाली आहे. एकापेक्षा एक तगडे उमेदवार या प्रभागात असल्याने राजकीय पक्षांनाही तिकीट देण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
राजेंद्रनगर प्रभागातील नगरसेविका जयश्री साबळे यांच्या प्रभागातील काही भाग नवीन रचनेमुळे स्वातंत्र्यसैनिक प्रभागाला जोडला गेला आहे. या प्रभागातून साबळे यांनी काँग्रेस पक्षाकडून लढण्याची तयारी सुरू केली आहे. राजेंद्रनगर प्रभागात पाच वर्षांमध्ये साबळे यांनी दहा कोटींची विकासकामे केली आहेत. निवडणुकीतील पूर्वानुभव व प्रभागात केलेली विकासकामे ही त्यांची जमेची बाजू ठरणार आहे.
स्वातंत्र्यसैनिक वसाहतीमधील माजी नगरसेविका शशिकला शेटे या सुद्धा निवडणूक लढविणार आहेत. नगरसेवक भूपाल शेटे यांनी या प्रभागात १४ कोटी २० लाखांची विकासकामे केली आहेत. पतीच्या विकासकामे व जनसंपकर् ाच्या जोरावर त्या मतदारांसमोर जाणार आहेत. काँग्रेस पक्षाकडून त्याही इच्छुक आहे.
सुहास सोरटे यांच्या पत्नी आशा सोरटे या मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. गतवेळेच्या निवडणुकीत या प्रभागातून सुहास सोरटे यांचा थोड्या मतांनी पराभव झाला होता. पराभवानंतर सोरटे कुटुंबीयांनी कोणतेही पद नसताना विविध सामाजिक कामांच्या माध्यमातून प्रभागात जनसंपर्क ठेवला आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
धनंजय महाडिक युवा शक्तीचे संचालक संग्रामसिंह निकम यांच्या पत्नी रूपा निकम या प्रथमच निवडणूक लढविणार आहेत. संग्रामसिंह यांनी युवा शक्तीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य सुरू केले आहे, तर त्यांच्या पत्नी रूपा यांनी बचत गटांमार्फत रोजगार उपलब्ध करून दिला आहे. प्रभागात चांगला जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे.
सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील यांच्या पत्नी शुभांगी पाटील यांनी प्रभागात केलेल्या विकासकामांच्या जोरावर या प्रभागातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यांनी राजेंद्रनगर, शाहू पार्क परिसरात महिला बचत गट, श्री स्वामी समर्थ भक्ती सेवा केंद्रामार्फत समाजप्रबोधन, महिलांसाठी योगशिबिराचे आयोजन केल्याने त्यांची प्रभागातील महिलांशी चांगली नाळ जोडली गेली आहे.
उद्योजक गिरीष शिंदे यांच्या पत्नी सुचिता शिंदे या निवडणूक लढविणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे व विविध शासकीय योजना तसेच सुचिता शिंदे यांनी वैयक्तिकरीत्या अनेक निर्धार व गरजू मुलांसाठी शैक्षणिक व आरोग्यांसाठी आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी मोठा जनसमुदाय आहे.
माजी नगरसेवक खंडू कांबळे यांच्या भावजय बकुळा सौदागर कांबळे यंदा निवडणूक लढविणार आहेत. विविध सामाजिक कार्यातून त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्याच जोरावर त्या निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. कोमल महादेव बिरजे याही यंदा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. कोमल यांचे पती महादेव बिरजे यांनी भाजपच्या माध्यमातून अनेक कामे केली आहेत.