शाहू महाराजांना अभिवादन करून संघर्ष यात्रेचा प्रारंभ
By admin | Published: April 25, 2017 05:08 PM2017-04-25T17:08:07+5:302017-04-25T17:08:07+5:30
नेत्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर दि. २५ : ‘शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा’,‘फडणवीस सरकार हाय-हाय’,‘ जो सरकार निक्कमी हैं, वो सरकार बदलनी हैं’, ‘कर्जमाफी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’,‘तूर खरेदी झालीच पाहिजे’,‘खोटारडे सरकार हाय-हाय’,अशा घोषणा देत छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीस अभिवादन करत कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकापच्या संघर्ष यात्रेला मंगळवारी सकाळी प्रारंभ झाला.
सकाळी सव्वा नऊच्या सुमारास संघर्ष यात्रेतील नेते कसबा बावड्यातील शाहू जन्मस्थळाजवळ पोहोचले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री रोहिदास पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, महापौर हसिना फरास, आमदार सुनील केदार, प्रकाश गजभिये, वसंतराव चव्हाण, आमदार विद्या चव्हाण, संध्यादेवी कुपेकर, माजी खासदार निवेदिता माने यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रारंभी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेसमोर अभिवादन केले.
त्यानंतर सर्वजण बाहेर येत असताना घोषणाबाजीला सुरुवात केली. सुरुवातीला आमदार गजभिये यांनी घोषणा द्यायला सुरुवात केल्यानंतर हसन मुश्रीफ, विद्या चव्हाण यांनीही घोषणा द्यायला सुरुवात केली. नेत्यांना घेऊन येणारी लक्झरी लवकर वळत नसल्याने सर्वच नेते जन्मस्थळासमोर घोषणा देत दहा मिनिटे उभे राहिले. त्यानंतर सर्वजण अंबाबाई मंदिराकडे रवाना झाले.
यावेळी स्थायी सभापती संदीप नेजदार, प्रल्हाद चव्हाण, ॠतुराज पाटील, तौफिक मुल्लाणी, गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, आदिल फरास, राजेश लाटकर यांच्यासह दोन्ही पक्षांचे नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे कॉलेज कुणाचे आहे?
सर्व नेत्यांना सोडल्यानंतर व्होल्वो बस वळवण्यासाठी डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रवेशद्वारातून आत घालण्यात आली. मात्र, गाडी मोठी असल्याने नेते अभिवादन करून आले तरी गाडी वळत नव्हती. बाहेर आल्यावर अखेर अजितदादांनी हे कॉलेज कुणाचे आहे इथे, आमची गाडी त्यामुळे वळत नाही, (माहिती असूनही) अशी विचारणा केली आणि तिथे हशा पिकला. शेजारची उंच इमारत कशाची आहे याचीही चौकशी त्यांनी सतेज पाटील यांच्याकडे केली.
माझा नेता कुठे आहे?
कसबा बावड्यातील सर्व काँग्रेसचे नगरसेवक आणि सतेज पाटील यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. खासदार धनंजय महाडिकही यावेळी उपस्थित होते. अभिवादन करून बाहेर पडत असताना सर्वजण फोटोसाठी उभारल्यानंतर मुश्रीफ मागे होते. तेव्हा मोठ्या आवाजात सतेज पाटील यांनी ‘माझा नेता कुठे आहे’ अशी विचारणा करत मुश्रीफ यांना हाताला धरून पुढे आणले. सतेज यांचा हा टोला कार्यकर्त्यांना बरेच काही सांगून गेला.
तूर विक्री नव्हे, तूर खरेदी
यावेळी घोषणा देताना महिला आमदारांनी चुकून तूर विक्री सुरू राहिलीच पाहिजे, अशी घोषणा दिली. मात्र, नेत्यांनी त्यात ‘विक्री’ नव्हे तर ‘खरेदी’ म्हणा, असे सांगितले आणि पुन्हा तशा घोषणा दिल्या गेल्या.
अजितदादांकडून जन्मस्थळावरील त्रुटींवर बोट
जन्मस्थळी आत येतानाचा प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला लाकडांच्या ओंडक्यांचा ढीग आहे. त्यावर झुडुपेही वाढली आहेत. याकडे बघत अजितदादांनी ‘हे काय आहे’ अशी विचारणा केली. ‘चालताना त्रास होणाऱ्या दगडी फरशा का घातल्या? पायाला त्रास होतोय’ असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘इतिहासकारांनी सांगितल्याने गुळगुळीत फरशा घातल्या नाहीत, जुन्याच पद्धतीच्या फरशा हव्यात, असे सांगितल्याने दगडी फरशा वापरल्या’ असे सतेज पाटील यांनी उत्तर दिले. ‘आता सिमेंट पण काढा म्हणावं मग’ अशी टिप्पणी अजितदादांनी केली तसेच अनेक ठिकाणी वायरिंग लोंबत होते. ‘हे काय आहे रे’अशी अजितदादांनी विचारणा केल्यानंतर मुश्रीफ यांनी ‘बंटीचं इकडं लक्ष नाही,’ असा टोला लगावला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीच्या संघर्ष यात्रेतील नेत्यांनी मंगळवारी सकाळी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी अभिवादन केले. यावेळी शाहू जन्मस्थळाबाहेर या नेत्यांनी सरकाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महापौर हसिना फरास, माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री सतेज पाटील, निवेदिता माने, आमदार विद्या चव्हाण, संध्यादेवी कुपेकर, प्रकाश गजभिये, हसन मुश्रीफ आदी उपस्थित होते.