बेळगाव : ‘केएलएस’चे शैक्षणिक कार्य गौरवास्पद राष्ट्रपती : बेळगाव येथे अमृतमहोत्सवी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 09:12 PM2018-09-15T21:12:42+5:302018-09-15T21:24:31+5:30
केएलएस संस्थेने केलेले शैक्षणिक कार्य गौरवास्पद आहे, असे उद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. बेळगाव येथे केएलएस संस्थेच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते.
बेळगाव : केएलएस संस्थेने केलेले शैक्षणिक कार्य गौरवास्पद आहे, असे उद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. बेळगाव येथे केएलएस संस्थेच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राज्यपाल वजुभाई वाला, मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपक मिश्रा, मुख्य अॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल, खासदार सुरेश अंगडी उपस्थित होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, राष्ट्रपती झाल्यावर मी पहिल्यांदाच बेळगावला आलो आहे. कर्नाटक लॉ सोसायटीने उच्च शिक्षणाचे महत्त्व ७५ वर्षांपूर्वी ओळखले.
कायद्याचे शिक्षण सुरू केले. उच्च शिक्षण महत्त्वाचे आहे. आपणही कायदा शिक्षण घेऊनच आपली कारकीर्द सुरू केली. कर्नाटकाचे राज्यपाल वजुभाई वाला हेसुद्धा वकील होऊन नंतर राजकारणात आले. केएलएसची स्थापना करणारेही वकीलच होते. याचा अभिमान वाटतो.
राष्ट्रपती म्हणाले, निसर्गाचा कायदा शिस्त शिकवतो. मानव हक्क कायदा हा नागरिकतेची गरज आहे. कायदा गरजेचा आहे तो देश घडविण्यासाठी. आज ही संस्था ४० शिक्षण संस्था चालवते. अंदाजे १४००० विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. माजी विद्यार्थीवर्गाची मोठी संघटना आहे. ती ५०,००० च्या घरी गेली आहे. या संस्थेने देशाला कायदे पंडित दिले. दोन माजी चीफ जस्टीस दिले. सध्याचे अॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल हे याच संस्थेचे आहेत याचा अभिमान वाटतो.
मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी म्हणाले, बेळगावात लवकरच शासकीय कार्यालये स्थलांतरीत करू. मीच मुख्यमंत्री असतेवेळी बेळगावत विधिमंडळाचे अधिवेशन घ्यायला सुरुवात केली.
राष्ट्रपतींचे सकाळी १०.१५ वाजता बेळगाव विमानतळावर आगमन झाले. कार्यक्रम आटोपून ते दुपारी दीड वाजता दिल्लीकडे रवाना झाले.
बेळगावातील जी. आय. टी. कॉलेज येथे के. एल. एस. संस्थेच्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते झाले. यावेळी राज्यपाल वजुभाई वाला, मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपक मिश्रा, मुख्य अटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल, खासदार सुरेश अंगडी, के. एल. एस. संस्थेचे संचालक उपस्थित होते.