विजय देवणे यांच्यावर बेळगाव बंदीचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:21 AM2021-03-07T04:21:52+5:302021-03-07T04:21:52+5:30

बेळगाव - महानगरपालिका समोर बेकायदेशीररीत्या फडकविण्यात आलेला लाल-पिवळा झेंडा हटविण्यासंदर्भात सोमवार दिनांक ८ मार्च रोजी पुन्हा महामोर्चाचे आयोजन ...

Belgaum ban order on Vijay Devne | विजय देवणे यांच्यावर बेळगाव बंदीचा आदेश

विजय देवणे यांच्यावर बेळगाव बंदीचा आदेश

Next

बेळगाव - महानगरपालिका समोर बेकायदेशीररीत्या फडकविण्यात आलेला लाल-पिवळा झेंडा हटविण्यासंदर्भात सोमवार दिनांक ८ मार्च रोजी पुन्हा महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला शिवसेनेचे विजय देवणे उपस्थित राहणार होते. परंतु प्रक्षोभक भाषण होऊन कोणताही अनुचित प्रकार घडेल, असे कारण पुढे करत बेळगाव शहरात विजय देवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

मागील वेळी प्रशासनाने महामोर्चा स्थगित करण्याची विनंती केली होती. सामंजस्याने हा प्रश्न सोडवून चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रशासन केवळ वेळकाढूपणा करत असल्याचे निदर्शनास येताच पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीने महामोर्चाची हाक दिली आहे. मागील वेळी महामोर्चा ऐनवेळी स्थगित करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर विजय देवणे आणि सहकाऱ्यांनी सीमेवर जोरदार निदर्शने केली. मनपासमोर कोणत्याही परिस्थितीत भगवा फडकविण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यावेळी पोलीस फाटा तैनात करण्यात आला आणि विजय देवणे आणि इतर सहकाऱ्यांना सीमेवरच रोखण्यात आले. सोमवार दिनांक ८ मार्च रोजी होणाऱ्या महामोर्चाला विजय देवणे उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळताच देवणे यांना भादंवि कलम १४४ (३) अन्वये बेळगावमध्ये रविवार दिनांक ७ मार्च रोजी सकाळी ६ ते मंगळवार दिनांक ९ मार्च सकाळी ६ पर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या मार्फत प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे.

यामध्ये विजय देवणे आणि सहकाऱ्यांना प्रवेश निषेध करण्यात आला असून कोणत्याही पद्धतीचे प्रक्षोभक भाषण होऊन बेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचेल, यासाठी प्रवेशबंदी करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. मागील वेळी मराठी भाषिक जनता संतप्तपणे महामोर्चा यशस्वी करण्याच्या निर्धारात होती. परंतु त्यावेळीही अशीच काही करणे पुढे करत सदर मोर्चा स्थगित करण्याची विनंती जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाने दिली होती. आताही अशाच पद्धतीचे कायदे आणि नियम पुढे करत प्रशासनाने मराठी भाषिकांची धास्ती घेतल्याचे निदर्शनास येत आहे.

Web Title: Belgaum ban order on Vijay Devne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.