बेळगाव जिल्ह्यातून दोघांना मंत्रीपद, सवदी-शशिकला जोल्ले यांनी घेतली शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 05:14 PM2019-08-20T17:14:54+5:302019-08-20T17:21:38+5:30
बेळगाव जिल्ह्यातून लक्ष्मण सवदी आणि शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांनी कर्नाटक मंत्रिमंडळाचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. इतर सर्व इच्छुकांना फाटा देण्यात आला आहे, त्यामुळे नाराजी वाढणार असल्याची शक्यता आहे.
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातून लक्ष्मण सवदी आणि शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांनी कर्नाटक मंत्रिमंडळाचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. इतर सर्व इच्छुकांना फाटा देण्यात आला आहे, त्यामुळे नाराजी वाढणार असल्याची शक्यता आहे.
कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुराप्पा यांनी अखेर राज्यपालांकडे आपल्या प्रस्तावित मंत्रिमंडळाचे पत्रक आणि यादी सादर केल्यानंतर आज त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला आहे. 17 जणांची यादी सादर करण्यात आली होती. आज सकाळी साडेदहा ते साडे अकराच्या काळात राजभवन येथे या मंत्र्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील नेते उमेश कत्ती, भाजपचे भालचंद्र जारकीहोळी यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळणार अशी चर्चा होती. या बरोबरच अनेक जण इच्छुक होते. आठ वेळा आमदार असलेल्या उमेश कत्ती यांना बाजूला सारत मागील विधानसभा निवडणुकीत अथणी मतदारसंघात निवडणूक हरलेल्या माजी मंत्री लक्ष्मण सवदी यांना संधी मिळाली आहे.
आपल्याला मंत्रीपद मिळणार म्हणून काही नवीन आमदारही गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. पण यावेळी नाराजी वाढली आहे. यावेळी भाजपमधील प्रत्येक जणच मंत्रिपदासाठी इच्छुक असताना 17 जणांची यादी तयार केली असून यामध्ये गोविंद कारजोळ, अश्वथ नारायण सी एन, के एस ईश्वराप्पा, आर अशोक ,जगदीश शेट्टर , बी श्रीरामलु, एस सुरेश कुमार, व्ही सोमन्ना, सिटी रवी, बसवराज बोंमाई, कोटे श्रीनिवास पुजारी, जेसी मधू स्वामी , चंद्रकांतगौडा पाटील, एच नागेश, प्रभू चव्हाण यांच्या बरोबरीने लक्ष्मण सवदी व शशिकला जोल्ले यांनी शपथ घेतली आहे.
माजी आमदार लक्ष्मण सवदी हे दुसऱ्यांदा मंत्री बनले आहेत तर दुसऱ्यांदा निपाणीच्या आमदार बनलेल्या शशिकला जोल्ले या प्रथमच कॅबिनेट मंत्री बनल्या आहेत. बंडखोर आमदारांना मुंबईत स्थलांतर करण्यात खासदार अण्णासाहेब जोल्ले, त्यांच्या पत्नी आमदार शशिकला जोल्ले व अथनीचे माजी आमदार माजी मंत्री लक्ष्मण सवदी या दोघांनी मोलाची भूमिका बजावली होती, त्यामुळेच त्या दोघांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली आहे.