बेळगाव : बांधकाम विभागाच्या निवासस्थानी जप्त केल्या त्या बनावट नोटा, एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:56 PM2018-04-18T12:56:20+5:302018-04-18T12:56:20+5:30
बेळगाव पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत बनावट नोटांचा साठा जप्त केला होता. या बनावट नोटा तब्बल ७ कोटी रुपयांच्या असून त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सरकारी निवासस्थानावर घातलेल्या छाप्यात आढळल्या आहेत.
बेळगाव : बेळगाव पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत बनावट नोटांचा साठा जप्त केला होता. या बनावट नोटा तब्बल ७ कोटी रुपयांच्या असून त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सरकारी निवासस्थानावर घातलेल्या छाप्यात आढळल्या आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी विजापूर येथील रहिवाशी अजित निडोनी या व्यक्तीस अटक केली असून या बनावट नोटा ५०० आणि २००० रुपयांच्या बनावट नोटा आहेत. हा साठा मध्यरात्री बेळगाव पोलिसांनी जप्त केल्या आहे.
या नोटा हुबेहूब खऱ्या नोटांसारख्या दिसतात. सदाशिवनगर मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंजुनाथ बागलकोटी यांच्या शासकीय निवासस्थानी हा साठा सापडला आहे. निवडणुकीत वाटण्यासाठी या नोटा आणल्या असाव्यात असा संशय यामुळे आता बळावला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मंजुनाथ आणि अजित हे दोघे मित्र आहेत.
पोलीस आयुक्त डी. सी. राजप्पा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मोठ्या बंदोबस्तात पहाटेपर्यंत मोजदाद सुरू होती. याचवेळी दुसऱ्या पथकाने निडोनी यास अटक केली.
सदाशिवनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या एका तिजोरीत या बनावट नोटांचा साठा करण्यात आल्याचे आढळून आले. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीही याची दाखल घेतली असून त्यांच्याकडून रात्री उशीरा पर्यंत पंचनामा सुरुहोता.
आता या नोटा कुठे छापल्या आणि कुणासाठी त्या वाटणार होते याचा तपास सुरू आहे. निडोनी याला यापूर्वीही बनावट नोटा छापल्याप्रकरणी अटक झाली होती. या प्रकरणातील तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, यामुळे पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.