बेळगावच्या मोर्चाला कोल्हापूरकर जाणार

By admin | Published: February 13, 2017 12:20 AM2017-02-13T00:20:51+5:302017-02-13T00:20:51+5:30

महापौरांचे सहभागी होण्याचे आश्वासन : क्रांती मोर्चाच्या निमंत्रकांनी घेतल्या शहरातील नेत्यांच्या भेटी

Belgaum's Morcha will go to Kolhapur | बेळगावच्या मोर्चाला कोल्हापूरकर जाणार

बेळगावच्या मोर्चाला कोल्हापूरकर जाणार

Next



कोल्हापूर : बेळगाव येथे होणाऱ्या सकल मराठा व मराठी मूक मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातूनही सकल मराठा समाजाच्या वतीने सहभागी व्हावे यासाठी मोर्चाच्या निमंत्रकांनी रविवारी कोल्हापुरात शाहू छत्रपती, महापौर हसिना फरास, खासदार संभाजीराजे, आदी नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांना आवाहन केले. या मोर्चात कार्यकर्त्यांसह आपण स्वत: मोर्चात सहभागी होणार असल्याचे महापौर हसिना फरास यांनी आश्वासन दिले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतील, असे आश्वासन यावेळी नेत्यांनी दिले.
सकल मराठा व मराठी समाजाच्या वतीने बेळगाव येथे १६ फेब्रुवारी रोजी क्रांती मूक मोर्चा निघणार आहे. या मोर्चाची जय्यत तयारी सुरू असून, मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचा पोटशूळ उठल्याने कर्नाटक प्रशासनाने या मोर्चाला गालबोट लावण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. बेळगाव येथील प्रशासन विविध कारणांनी अनेक अडचणी उभ्या करून रोज नवीन प्रश्न निर्माण करून मोर्चाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या मोर्चाला विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यातून, सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशी सीमावासीयांची इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर या मोर्चाचे निमंत्रक, बेळगाव महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अ‍ॅड. अमर यळ्ळूरकर, नेताजी जाधव, महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य व निपाणीचे अध्यक्ष जयराम मिरजकर, मोर्चाचे जनसंपर्क अधिकारी विकास कलघटकी यांनी रविवारी शाहू छत्रपती यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी, कोल्हापूरचे पालकमंत्री आणि सीमावादाबाबतचे महाराष्ट्र शासनाचे समन्वयक चंद्रकांतदादा पाटील यांनी कर्नाटक शासनाच्या दडपशाहीबाबत केंद्राला भूमिका कळवावी, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावेळी शाहू छत्रपती यांनी याबाबत मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी फोन करून चर्चा केली. या शिष्टमंडळाने खासदार संभाजीराजे यांचीही भेट घेऊन त्यांना मोर्चात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. त्यांनीही मोर्चात कार्यकर्ते सहभागी होतील; तसेच आपणही या मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
महापौर हसिना फरास यांचीही या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. कोल्हापूर शहरातील जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगरसेविका व कार्यकर्त्यांसह आपण स्वत: या मोर्चात सहभागी होऊ, असेही आश्वासन महापौर फरास यांनी दिले. (प्रतिनिधी)
सीमावासीयांची इच्छा
मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचा पोटशूळ उठल्याने कर्नाटक प्रशासनाने या मोर्चाला गालबोट लावण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
बेळगाव येथील प्रशासन विविध कारणांनी अनेक अडचणी उभ्या करून रोज नवीन प्रश्न निर्माण करून मोर्चाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या मोर्चाला विशेषत: कोल्हापूर जिल्ह्णातून, सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशी सीमावासीयांची इच्छा आहे.

Web Title: Belgaum's Morcha will go to Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.