बेल्जियममध्येही शाहू महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:53 AM2018-09-29T00:53:43+5:302018-09-29T00:53:46+5:30
कोल्हापूर : बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथील १0 व्या आशिया-युरोप संसदीय सहयोगी बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करणारे खासदार संभाजीराजे यांना पोलंडच्या शिष्टमंडळाने आश्चर्याचा सुखद धक्का दिला. कोल्हापूरपासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या पोलंडच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या शाहू महाराजांच्याविषयीच्या या कृतज्ञतेमुळे संभाजीराजेही भारावले.
या बैठकीला उपस्थित असणाºया पोलंडच्या शिष्टमंडळामध्ये सिनेटचे उपसभापती बॉग्डॅन बोरूसेविक्झी यांचा समावेश होता. त्यांनी खासदार संभाजीराजे यांना ‘महाराज’ असे संबोधले. एका युरोपियन देशात दुसºया युरोपियन देशातील व्यक्ती आपल्याला महाराज म्हणून संबोधते, याचे संभाजीराजे यांना आश्चर्य वाटले. त्यांनी याबाबत संबंधितांकडे विचारणा केली आणि मग पोलंडवासीय, कोल्हापूर आणि शाहू महाराजांचे औदार्य याचीच चर्चा रंगली.
दुसºया महायुद्धात पोलंडची मोठी वाताहत झाली. पोलंडच्या हजारो नागरिकांना पकडण्यात आले, छळछावण्यांत ठेवण्यात आले. त्यातील अनेकजण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यात अनेक महिला आणि लहान मुले होती. ब्रिटिशांचा त्यांच्यावर रोष होता आणि ब्रिटिशांचे साम्राज्य जगभर पसरलेले होते. साहजिकच पोलंडच्या या निर्वासितांना आश्रय द्यायला कुणी तयार नव्हते; पण करवीर संस्थानिकांनी ब्रिटिश सरकारचा रोष पत्करून पोलंडच्या या निर्वासितांना आश्रय देण्याचा निर्णय घेतला. केवळ आश्रयच दिला नाही, तर १0 हजार जणांसाठी सुसज्ज अशी वळिवडे येथे स्वतंत्र वसाहतच स्थापन केली.
२०१४ मध्ये पोलंड, अमेरिका, युनायटेड किंगडम, आॅस्ट्रेलिया, कॅनडा, प. आशिया आणि दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झालेल्या सुमारे ७५ माजी विस्थापितांनी कोल्हापुरातील आपल्या वास्तव्याच्या स्मृती जागवण्यासाठी ४ आणि ५ मार्च २०१४ रोजी कोल्हापूरला भेट दिली होती. खासदार संभाजीराजे यांनी सक्रीय संसदपटू म्हणून आपल्या उदात्त घराण्याची परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. याबद्दल यावेळी आनंद व्यक्त करून बोरूसेविक्झी म्हणाले, ‘आपल्या राजघराण्याने आमच्या लोकांवर आलेल्या संकटकाळात जी माणुसकी, औदार्य आणि सहानुभूती दाखवली, त्याबद्दल माझा देश आणि देशातील लोक आपल्या राजघराण्याचा अत्यंत आदर करतो.’