स्वत:वर विश्वास ठेवा, तयारीत सातत्य राखास्वत:वर विश्वास ठेवा, तयारीत सातत्य राखा
By admin | Published: June 5, 2017 01:18 AM2017-06-05T01:18:37+5:302017-06-05T01:18:37+5:30
स्वत:वर विश्वास ठेवा, तयारीत सातत्य राखा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : स्पर्धा परीक्षांतील यशासाठी स्वत:वर विश्वास ठेवा, तयारीत सातत्य राखा आणि प्रामाणिकपणे अभ्यास करा, असा सल्ला पुणे येथील द युनिक अकॅडमीचे प्रा. हर्षल लवंगारे यांनी रविवारी येथे दिला.
येथील ‘लोकमत अॅस्पायर’ शैक्षणिक प्रदर्शनात त्यांचे व्याख्यान झाले. ‘पदवी काळात यूपीएससी आणि एमपीएससी’ची तयारी कशी करावी?’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रा. हर्षल लवंगारे म्हणाले, जोपर्यंत तुमचा अॅटिट्यूड हा विद्यार्थी असण्याचा, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विविध माहिती समजून घेण्याचा असेल, तोपर्यंत तुमचा स्पर्धा परीक्षेतील प्रवास सुरू राहणार आहे. त्यामुळे यश मिळविण्यासाठी अखेरपर्यंत प्रत्येक क्षणी आपण विद्यार्थी आहोत, असा अॅटिट्यूड असणे महत्त्वाचे आहे. यूपीएससी, एमपीएससीमध्ये अभ्यासाचे नियोजन केल्याशिवाय यश मिळत नाही. यासाठी विविध पुस्तकांचे वाचन, मुलाखतीची तयारी, आदींचे सूक्ष्म नियोजन असणे आवश्यक आहे. योग्य नियोजन असेल, तर यशासाठी अडीच वर्षेदेखील पुरेशी आहेत. स्पर्धा परीक्षेतील यशाचे तुमचे स्वप्न हे हळूहळू आई-वडिलांचे बनत असते. त्यांचा तुमच्यावर विश्वास असतो, पाठबळ असते. त्यामुळे आई-वडिलांवर निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास करा. आपण कोण आहोत?, आपल्याला कुठे जायचे आहे, काय होणार आहात? याचे नियोजन करा. स्वत:वर विश्वास ठेवा, अभ्यास आणि तयारीत सातत्य राखा. कष्ट करा, जिद्दीने अभ्यास करा. मनात आणले, तर निश्चितपणे स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हाल. दरम्यान, दीड तासाहून अधिकवेळ चाललेल्या व्याख्यानामध्ये प्रा. लवंगारे यांनी उपस्थितांना यूपीएससी, एमपीएससीच्या परीक्षांचा बदललेला अभ्यास, स्वरूप, प्रश्नपत्रिका, मुलाखतीची तयारी, आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थी, पालकांच्या विविध प्रश्नांची उत्तरे, शंकांचे निरसन त्यांनी केले.
प्रा. लवंगारे यांच्या टिप्स
अचूक व नियोजनबद्ध अभ्यासतंत्राचा अवलंब करा.
पक्की तयारी, अभ्यास केल्यास तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकणार नाही.
स्पर्धा परीक्षांसाठी तुम्ही कसे दिसता, तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे, याऐवजी तुमचे अंतरंग कसे आहे, तुम्ही कसा विचार करता, याची चाचपणी केली जाते.
मुलाखतीची तयारी-मुख्य परीक्षा-पूर्वपरीक्षा या क्रमाने स्पर्धा परीक्षांची तयारी करा.
विविध संदर्भ पुस्तके, वर्तमानपत्रांचे वाचन करा.
विद्यार्थी, पालकांची मोठी गर्दी
प्रा. लवंगारे यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी विद्यार्थी, पालकांनी मोठी गर्दी केली होती. व्यासपीठाच्या परिसरात खाली बसून, उभे राहून अनेक विद्यार्थी, पालकांनी मार्गदर्शन ऐकले. अनेक विद्यार्थी प्रा. लवंगारे यांच्या मार्गदर्शनातील मुद्दे वहीमध्ये टिपून घेत होते. या मार्गदर्शनातून स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबतची योग्य, चांगली माहिती मिळाल्याचे समाधान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.