महापालिका क्षेत्रातील शाळांची आज घंटा वाजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:18 AM2020-12-07T04:18:57+5:302020-12-07T04:18:57+5:30
कोल्हापूर : महापालिका क्षेत्रातील नववी ते बारावीपर्यंतच्या ९० टक्के शाळांची आज, सोमवारी घंटा वाजणार आहे. यापूर्वी १८ शाळा सुरू ...
कोल्हापूर : महापालिका क्षेत्रातील नववी ते बारावीपर्यंतच्या ९० टक्के शाळांची आज, सोमवारी घंटा वाजणार आहे. यापूर्वी १८ शाळा सुरू होत्या. आता उर्वरित ८० शाळाही सुरु होणार असून, विद्यार्थ्यांच्या सुटीला आठ महिन्यांनंतर ब्रेक लागणार आहे. रोज चार तासच शाळा सुरू राहणार आहे.
कोरोनामुळे मागील महिन्यात राज्य शासनाने अटी व नियम घालून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले. यामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना तपासणी तसेच पालकाकडून संमतीपत्रे बंधनकारक केली होती. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सर्व नियमांचे पालन झाल्यानंतरच शाळा सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. १५०२ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कोरोना तपासण्या झाल्या असून बहुतांश पालकांकडून संमतीपत्रे आली आहेत. दरम्यान, शाळा नियंत्रण समितीने संबंधित शाळांची पाहणी करून त्रुटी दूर करण्याची सूचना केली.
चौकट
महापालिका क्षेत्रातील एकूण शाळा : ११२
यापूर्वी सुरू असलेल्या शाळा : १८
आज सुरु होणाऱ्या शाळा : ८०
नववी ते बारावी एकूण विद्यार्थी : ४२ हजार १६५
नववी ते दहावीतील विद्यार्थी : २६ हजार ७४३
अकरावी ते बारावी विद्यार्थी : १५ हजार ४२२
एकूण शिक्षक : ११९५
कोरोना तपासणी झालेले शिक्षक : ११९०
शिक्षकेतर कर्मचारी : ४१०
कोरोना तपासणी झालेले शिक्षकेतर कर्मचारी : ४०२
चौकट
आजारी असणाऱ्यांना नो एंट्री
सर्व शाळांचे सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. प्रत्येक वर्ग सोयीनुसार वेळपत्रक बनवणार आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी आजारी असल्यास प्रवेश दिला जाणार नाही. तसेच शाळेमध्ये येणे अथवा जाताना सुरक्षित प्रवास करावा, अशाही सूचना विद्यार्थ्यांना केल्या आहेत.