बेळगावचे मराठी नगरसेवक डरपोक : एन. डी. पाटील
By admin | Published: November 23, 2014 12:36 AM2014-11-23T00:36:13+5:302014-11-23T00:36:13+5:30
मराठी भाषिकांच्या भावनेशी प्रतारणा
कोल्हापूर : सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. साक्षी नोंदण्याच्या टप्प्यात खटला पोहोचला आहे. अशावेळी कर्नाटक शासन कारवाई करेल या भीतीपोटी बहुसंख्य मराठी भाषिकांच्या भावनेशी प्रतारणा बेळगावचे मराठी भाषिक महापौर, उपमहापौर, नगरसेवक करीत आहेत. ते डरपोक आहेत. त्यांच्या या कृतीचा खटल्यावर काहीही परिणाम होणार नाही, असे प्रतिपादन सीमा लढ्यातील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहात कोल्हापूरच्या टोलप्रश्नी आयोजित बैठकीनंतर पत्रकारांनी बेळगावातील मराठी नगरसेवकांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले. यावर पाटील बोलत होते. ते म्हणाले, अनेक वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी विविध मार्गाने लढा देत आहेत. सध्या सीमा खटल्यातील साक्षी नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशावेळी मराठी भाषिक महापौर, उपमहापौर, नगरसेवक यांनी १ नाव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनात सहभागी झाले नाहीत. बरखास्तीच्या भीतीने महानगरपालिकेत सीमा प्रश्नाचा ठराव करण्याची परंपरा खंडित केली. यावरून नगरसेवकांना सीमाप्रश्नासंबंधी फारसे गांभीर्य नाही, हे स्पष्ट होते. ते काय भूमिका घेतात, याच्याशी आमचे काही देणे, घेणे नाही. त्यांना निवडून दिलेले मराठी भाषिक यांचा गांभीर्याने विचार करतील. त्यांचे राजकीय भवितव्य मराठी भाषिक मतदार ठरवतील; परंतु नगरसेवकांची डरपोक वृत्ती दिसून येत आहे. ते आमच्या सोबत आले काय किंवा नाही आले काय, फारसा फरक पडत नाही. त्यांना निवडून दिलेले विचार करतील. सीमा भागातील बहुसंख्य अशा मराठी भाषिकांसाठी लढा सुरू आहे.