लाडक्या बहिणी आमिषाला बळी पडणार नाहीत, नंदिनी बाभूळकर यांचा ‘महायुती’वर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 01:31 PM2024-10-03T13:31:51+5:302024-10-03T13:32:22+5:30
गडहिंग्लज : राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. वर्षाच्या बालिकेपासून ते सत्तर वर्षाच्या वृद्धेचेही त्यातून सुटका झालेली नाही. त्याबद्दल समाजात ...
गडहिंग्लज : राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. वर्षाच्या बालिकेपासून ते सत्तर वर्षाच्या वृद्धेचेही त्यातून सुटका झालेली नाही. त्याबद्दल समाजात प्रचंड असंतोष असून, अत्याचाराकडे महिलांचे लक्ष जाऊ नये यासाठीच ‘लाडकी बहीण’ योजनेचे आमिष दाखवले जात आहे. मात्र, त्याला महिला बळी पडणार नाहीत, असा विश्वास डॉ. नंदिनी कुपेकर-बाभूळकर यांनी व्यक्त केला.
हलकर्णी येथे आयोजित जनसंवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या. उदय जोशी, रामराज कुपेकर, शिवाजी सावंत, शशीकला देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाभूळकर म्हणाल्या, राज्यातील शेतकरी, कामगार, महिला, युवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कंत्राटदार आणि शासकीय-निमशासकीय कर्मचारी सगळेच नाराज आहेत. प्रलंबित, न्याय मागण्यांसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे महायुती सरकारचा पराभव अटळ आहे.
यावेळी जब्बार मुल्ला, अबुबकर बाणदार, जानबा सावंत, महाबळेश्वर कापसे, आप्पासाहेब पाटील, श्रीशैल गोटुरे, भैरू खांडेकर, गणेश फाटक, बाबूराव पाटील, आयेशा बाणदार, आदी उपस्थित होते.
हलकर्णी भागाला पाणी देणार
बाबासाहेब कुपेकर यांच्यामुळे हिरण्यकेशीच्या काठावरील शेतकऱ्यांच्या जीवनात सुखाचे दिवस आले. परंतु, ‘निलजी’च्या पुढे चित्रीचे लाभक्षेत्र नसल्यामुळे हलकर्णी भागातील जनतेला दरवर्षी पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे तेरणी, येणेचवंडी, नरेवाडी या तलावांच्या पुनर्भरणाबरोबरच पूर्वभागातील जनतेला हक्काचे पाणी देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही डॉ. कुपेकर यांनी दिली.