बेनझीर व्हिला होणार पर्यटनस्थळ
By admin | Published: December 21, 2016 10:28 PM2016-12-21T22:28:35+5:302016-12-21T22:28:35+5:30
आराखड्याचे काम सुरू : पर्यटन व्यवसाय वाढीला मोठी मदत होणार
संजय पारकर -- राधानगरी धरणातील शाहू महाराजांचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या बेनझीर व्हिलाचे व हत्तीमहाल येथील वास्तूचे लवकरच पर्यटनस्थळात रूपांतर होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पाटबंधारे विभागाला दिलेल्या सूचनेनुसार याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. बेनझीर व्हिलाची दुरुस्ती, परिसर सुशोभिकरण करून तेथे जाण्यासाठी बोटीची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने होणाऱ्या शाहूंच्या स्मारक केंद्राची जागा निश्चित झाली आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर येथे पर्यटन व्यवसाय वाढीला मदत होणार आहे.
शाहू महाराजांनी आपल्या कायर्काळात या परिसरात अनेक वास्तू उभारल्या. धरण उभारणी काळात या कामावर देखरेख ठेवण्यासाठी येणाऱ्या तज्ञांसाठी एका टेकडीवर हा बेनझीर बंगला बांधला होता. ते स्वत:ही येथे काहीवेळा वास्तव्यास असत. धरणात पाणी संचय झाल्यावर टेकडीच्या सभोवती पाण्यामुळे या टेकडीला बेटाचे स्वरूप येते. धरण पूर्ण झाल्यावर या वास्तूकडे दुर्लक्ष झाले. उन्हाळ्यात धरण पूर्ण रिकामे झाले तरच येथे जाता येते. त्यामुळे येथे फारसे कोणी फिरकत नाही. गेल्या वर्षी ही संधी मिळाली. प्रसार माध्यमातून याची माहिती मिळाल्यावर येथे पर्यटकांची रीघ लागली होती.
अनेक वर्षे ही वास्तू देखभाली अभावी उन-पावसाचा मारा सहन करीत उभी आहे. दगडी बांधकाम भक्कम असले तरी प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यांची दुरुस्ती कण्याची मागणी लोकांकडून होत होती. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी या परिसराची काही दिवसांपूर्वी पाहणी केली होती. त्यांनी यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाने याचा आराखडा करण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी सुमारे दीड कोटी खर्च येईल असा अंदाज आहे.
१ बेनझीर बंगल्याचे सुशोभिकरण व बोटिंगची सुविधा झाल्यावर त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ते जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या कोल्हापुरातील राजर्र्षी शाहू मेमोरियल ट्रस्ट कडे देण्यात येणार आहे.
२ धरण परिसरात कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत शाहू महाराज स्मारक व माहिती केंद्र होणार आहे. यासाठी जागेचा प्रश्न होता. तो मार्र्गी लागला आहे.महाजनकोच्या वीजनिर्मिर्ती केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ पश्चिम बाजूची जागा यासाठी निश्चित केली आहे.
३ धरणावर खासगी तत्त्वावर जलविद्युतनिर्मिर्ती केंद्राचे काम करताना या कंपनीने धरणाच्या आतील बाजूला, पाटबंधारेच्या विश्रामगृह परिसरात विश्रामगृह बांधले होते. तक्रार झाल्यावर ते बांधकाम अर्धवट राहिले. ही इमारत पाटबंधारे विभागाने ताब्यात घेतली आहे. तेथे काही सुधारणा करून त्याचा वापर आता शासकीय प्रशिक्षण केंद्र व बैठका
यासाठी करण्यात येणार आहे.