‘खंडपीठ’ हाच केंद्रबिंदू
By Admin | Published: June 13, 2017 12:20 AM2017-06-13T00:20:58+5:302017-06-13T00:20:58+5:30
बार असोसिएशन निवडणूक : उद्या मतदान, निकाल; २८ उमेदवार रिंगणात
लोकमत न्यूज नेटवर्क -कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या २०१७-१८ या वर्षीच्या कार्यकारिणीसाठी अॅड. पीटर बारदेस्कर विरुद्ध अॅड. प्रशांत शिंदे यांच्या पॅनेलमध्ये निवडणूक दुरंगी व चुरशीची होत आहे. एकूण १४ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात असून, उद्या, बुधवारी (दि. १४) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान व त्यानंतर मतमोजणी, निकाल जाहीर केला जाणार आहे. गेल्या वर्षी निवडणुकीततिरंगी लढत झाली होती, पण यंदा ही निवडणूक दुरंगी असल्यामुळे पॅनेल टू पॅनेल मतदान होण्याची दाट शक्यता आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, जॉर्इंट सेक्रेटरी, महिला प्रतिनिधी, लोकल आॅडिटर यासह नऊ कार्यकारिणी सदस्य अशा १४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. महिला प्रतिनिधीपदी अॅड. शिंदे पॅनेलच्या आसावरी अभिजित कुलकर्णी यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. सुमारे १५६५ मतदार पात्र आहेत. दोन्हीही पॅनेलप्रमुखांनी ‘खंडपीठ’ हाच प्रचाराचा मुद्दा बनविला आहे. कोल्हापूर शहरात सुमारे ४० तसेच जिल्ह्यात एकूण ८५ न्यायालये आहेत. या न्यायालयातील पात्र वकिलांना मतदानाचा अधिकार आहे. गेल्या चार दिवसांत शहरासह तालुकास्तरावरील न्यायालयात जाऊन दोन्ही पॅनेलप्रमुखांनी प्रचार केला आहे. आज, मंगळवारी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे तर उद्या, बुधवारी मतदानानंतर सायंकाळी त्वरित मतमोजणी होऊन रात्री निकाल जाहीर केला जाणार आहे.
‘खंडपीठ’ आंदोलनाची दिशा बदलणार
गेल्या वर्षी खंडपीठासाठी आंदोलन करून हाती काहीच लागले नाही. त्यामुळे सहा जिल्ह्यांतील वकिलांची मते आजमावून आंदोलनाची दिशा बदलण्याचा विचार सुरू असल्याचे मत अध्यक्षपदाचे उमेदवार व पॅनेलप्रमुख अॅड. प्रशांत शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. सर्किट बेंचचा प्रश्न सोडविण्यावर अधिक प्रमाणात भर देणार आहे. या आंदोलनापासून अनेक ज्येष्ठ वकील अलिप्त आहेत, त्यांनाही आंदोलनाच्या मुख्य प्रवाहात आणणार आहे. याशिवाय युवा वकिलासाठी मार्गदर्शन शिबिरे घेण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
खंडपीठ लढाई रस्त्यावर आणणार
नागरिकांच्या सहभागाने खंडपीठासाठी रस्त्यावर लढाई लढणार असून, त्यामध्ये सहा जिल्ह्यांतील वकिलांसह सर्वपक्षीय खंडपीठ कृती समितीचा सहभागवाढीसाठी भर देणार असल्याचे अध्यक्षपदाचे उमेदवार व पॅनेलप्रमुख अॅड. पीटर बारदेस्कर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. न्यायाधीश आणि वकील यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यासाठी दोन्हीही घटकांत समन्वय साधणारा कृतिबद्ध कार्यक्रम राबविणार आहे. अत्याधुनिक लायब्ररी, तज्ज्ञांची व्याख्याने, मार्गदर्शन शिबिरे भरवणार, तालुकास्तरीय बार सक्षमीकरणासाठी फर्निचर, पुस्तके उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.