वहिवाटदारांनीच सोडला हक्क !

By admin | Published: November 17, 2015 12:37 AM2015-11-17T00:37:53+5:302015-11-17T00:45:19+5:30

इंचनाळ देवस्थान : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसमोर मांडले म्हणणे !

Beneficiaries leave the right! | वहिवाटदारांनीच सोडला हक्क !

वहिवाटदारांनीच सोडला हक्क !

Next

राम मगदूम-- गडहिंग्ल--इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील श्री गणपती देवस्थान जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी-विक्री व्यवहाराची चौकशी सुरू असतानाच या जमिनीच्या मूळ वहिवाटदाराच्या वारसांनीच ‘त्या’ जमिनीवरील हक्क स्वखुशीने सोडून दिला आहे. तसा लेखी जबाबच त्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीसमोर मांडला आहे. त्यामुळे वादग्रस्त पावणेसात एकर जमीन ‘देवा’च्या मालकीची होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पेशवाईत जीर्णोद्धार झालेल्या इंचनाळ येथील प्राचीन गणपती देवाची पूजा-अर्चा आणि देखभालीसाठी इनाम मिळालेल्या जमिनीपैकी सुमारे ६ एकर २९ गुंठे बागायती जमीन बेकायदेशीर विकण्याचा प्रयत्न झाला आहे. यासंबंधीचा वाद पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि येथील प्रांताधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे.
वादग्रस्त जमिनीचे मूळ वहिवाटदार गजानन बाळकृष्ण जोशी-दंडगे यांनी ५६ वर्षांपूर्वी त्यांचे सख्खे बंधू मनोहर यांना या जमिनीसंदर्भात वटमुखत्यारपत्र करून दिले होते. त्या बेकायदा वटमुखत्यारपत्राच्या आधारेच त्यांनी ही जमीन आनंदराव पोवार यांना १२ वर्षांपूर्वी करारपत्राने १६ लाखाला विकली आहे. वटमुखत्यार मनोहर यांनी जमिनीचे खरेदीपत्र करून देण्यास टाळाटाळ केल्यामुळे पोवार यांनी येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दाद मागितली होती. त्या दाव्याच्या सुनावणीअंती धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेऊन खरेदीपत्र पूर्ण करून द्यावे आणि परवानगी न मिळाल्यास त्यासाठी दिलेल्या रकमेची व्याजासह वसुली वादींना करता येईल, असा निकाल न्यायालयाने दिला होता.
दरम्यान, वहिवाटदार गजानन जोशी यांचे निधन झाल्यानंतर ३ वर्षाने त्यांच्याच नावाने, सहीने बोगस अर्ज करून या जमिनीची खातेफोड करून एका हिश्श्याची देवस्थान इनाम खालसा करून घेण्यात आली. आॅगस्ट २०१५ मध्ये ‘त्या’ जमिनीवर पीक-पाणी नोंदवून घेण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळेच या प्रकरणाला वाचा फुटली.


वारसाचा जबाब असा
देवस्थान जमिनीचे वहिवाटदार मृत गजानन जोशी यांचा मुलगा अनिल जोशी (वय ७२) यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीसमोर १ आॅक्टोबर २०१५ रोजी दिलेला लेखी जबाब असा - श्री गणपती देवस्थान मालकीच्या जमिनी या देवाची पूजा-अर्चा व समार्दनासाठी आमच्या घराण्यात परंपरेने इनामी सुटलेल्या आहेत. या जमिनीचे वहिवाटदर माझे वडील गजानन बाळकृ ष्ण जोशी हे सप्टेंबर २००५ मध्ये मृत झाले आहेत. त्यांचे सरळ व कायदेशीर वारस राजशेखर, विनय व मी स्वत: असे तीन मुलगे वारस आहोत. बँकेतील नोकरीनंतर मी सेवानिवृत्त झालो असून कोल्हापूरमध्येच स्थायिक आहे. त्यामुळे या मिळकती आणि देवस्थानची पूजा व देखभाल यासाठी आतापर्यंत माझा काहीच संबंध आला नाही. वडिलांच्या मृत्यूनंतर वारस म्हणून माझा संबंध येत असला तरी पूजा-अर्चा व देखभाल करणे मला शक्य नसल्याने या जमिनीवरील माझा वारसा हक्क स्वखुशीने सोडून देत आहे. त्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही व्हावी. याबाबत मी भविष्यात या जमिनीवर कोणताही हक्क सांगणार नाही अगर कोणतीही न्यायप्रविष्ठ बाब निर्माण करणार नाही.


इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील गणपती देवस्थान जमिनीचे मूळ वहिवाटदार मृत गजानन जोशी यांचा मुलगा अनिल यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे दिलेला लेखी जबाब.


निकालाची प्रतीक्षा
देवस्थान जमिनीच्या बेकायदेशीर व्यवहाराची चौकशी होऊन देवस्थान जमिनीवरील ‘देवाची मालकी’ अबाधित रहावी यासाठी ग्रामस्थ व गणेशभक्तांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि गडहिंग्लजच्या प्रांताधिकाऱ्यांकडे रीतसर दाद मागितली आहे. याप्रकरणी देवस्थान समितीची चौकशी सुरू असून प्रांताकडील चौकशी पूर्ण झाली आहे. आता त्यांना निकालाची प्रतीक्षा आहे.

इंचनाळ देवस्थान जमीन वाद

Web Title: Beneficiaries leave the right!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.