‘सर्वांची’ बहुरंगी लढतीच्या लाभाचीच ‘व्यूहरचना’

By admin | Published: June 18, 2014 01:03 AM2014-06-18T01:03:15+5:302014-06-18T01:04:59+5:30

राष्ट्रवादीसमोर आव्हान; ‘स्वाभिमानी’ची लढत सर्र्वांना धक्का देणार

'Benefit' of 'all' | ‘सर्वांची’ बहुरंगी लढतीच्या लाभाचीच ‘व्यूहरचना’

‘सर्वांची’ बहुरंगी लढतीच्या लाभाचीच ‘व्यूहरचना’

Next

राम मगदूम ल्ल गडहिंग्लज
चंदगड विधानसभेची आगामी निवडणूक बहुरंगीच होण्याची शक्यता असून, बहुरंगी लढतीचा लाभ उठविण्यासाठीच सर्व पक्ष व गटांची व्यूहरचना सुरू आहे. योगायोगाने गेल्या पाच वर्षांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर ‘स्वाभिमानी’चेच आव्हान असून, सर्वांनाच स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
पुनर्रचित चंदगड विधानसभा मतदारसंघात संपूर्ण चंदगड तालुक्यासह गडहिंग्लज तालुक्यातील नूल, हलकर्णी, महागाव व नेसरी आणि आजरा तालुक्यातील कोळिंद्रे या जि. प. मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामध्ये चंदगड- १२८, गडहिंग्लज-९१, तर आजऱ्यातील २७ मिळून २४६ खेड्यांचा समावेश आहे. एकूण मतदारसंख्या सुमारे तीन लाखांच्या आसपास आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी संध्यादेवींना सर्वांचा पाठिंबा असतानाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजेंद्र गड्ड्यान्नावर यांना लक्षणीय मते मिळाली. त्याचप्रमाणे अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतदेखील राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांच्यापेक्षा शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना १९,५४८ मते जादा मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीची वाट ‘बिकट’ बनली आहे. ‘राष्ट्रवादी’चा उमेदवार कोण? यावरच आगामी निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.
तथापि, पक्षीय राजकारणासाठी जागरूक असणाऱ्या गडहिंग्लज आणि व्यक्तीकेंद्रित राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या चंदगड या दोन तालुक्यांत यावेळी ‘आमदारकी’साठी रस्सीखेच होईल. किंबहुना, तालुक्याच्या अस्मितेच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली जाईल.
चार वर्षांपासून बंद असलेला दौलत साखर कारखाना, वादग्रस्त ‘एव्हीएच’ प्रकल्प आणि आर्थिक अरिष्टात सापडलेला गडहिंग्लज साखर कारखाना याच कळीच्या मुद्द्यांभोवती प्रचाराचा धुरळा उडणार असल्यामुळे नेते व त्यांच्या राजकीय वारसदारांना स्वत:च्या अस्तित्वासाठीच संघर्ष करावा लागेल.
‘जनसुराज्य’चा उमेदवार कोण ?
अलीकडील दशकात ‘जनसुराज्य’ने जुन्या चंदगड व गडहिंग्लज आणि नव्या चंदगड मतदारसंघाची निवडणूक लढवली. जनसुराज्यच्या उमेदवारीवरच नरसिंगराव पाटील निवडून आले होते, तर प्रकाशराव चव्हाण व गोपाळराव पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. या पार्श्वभूमीवर यावेळीदेखील नवीन चेहऱ्याचा उमेदवार रिंगणात उतरविण्याची जनसुराज्यची व्यूहरचना सुरू आहे. त्यामुळे जनसुराज्यचा उमेदवार कोण? याची उत्सुकता आहे.
‘महायुती’ची उमेदवारी कोणाला ?
माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील व महिला काँगे्रसच्या जिल्हाध्यक्षा अंजना रेडेकर यांचे अजूनही युतीशी ऋणानुबंध आहेत. तथापि, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गड्ड्यान्नावर हेच महायुतीच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार असले तरी चंदगड तालुक्यातील ‘मताधिक्या’मुळे राजेश पाटील व नितीन पाटील हेदेखील चर्चेत आहेत.
प्रा. शिंत्रे यांनी शिवसेनेतर्फेच पोटनिवडणूक लढवली आहे. महायुतीच्या तिकिटावर राजू शेट्टी दुसऱ्यांदा खासदार झाले असून, अलीकडेच प्रा. संजय मंडलिक हे शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख झाले आहेत. चंदगडच्या उमेदवारीत दोघांचीही भूमिका महत्त्वाची असल्यामुळे महायुतीची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Web Title: 'Benefit' of 'all'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.