दहा हजार लाभार्थींना निराधार योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:25 AM2021-08-29T04:25:36+5:302021-08-29T04:25:36+5:30
हुपरी : जयवंतराव आवळे फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून आपण संजय गांधी निराधार योजनेचे काम करत आहोत. आतापर्यंत हातकणंगले ...
हुपरी : जयवंतराव आवळे फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून आपण संजय गांधी निराधार योजनेचे काम करत आहोत. आतापर्यंत हातकणंगले तालुक्यातील सुमारे दहा हजाराहून अधिक लाभार्थीना अनुदान मिळवून देण्याचे काम केले आहे. पेन्शन हा गरिबाचा आधार असल्याने हाच आधार आपण त्यांना मिळवून दिल्यामुळे वृध्द, विधवा,अपंग व निराधारांचा आशीर्वाद आपल्याला लाभत आहे. त्याच आशीर्वादाने आपण आमदार झालो असल्याचे मत संजय गांधी निराधार योजना कमिटीचे अध्यक्ष आमदार राजू जयवंतराव आवळे यांनी व्यक्त केले.
हुपरी (ता.हातकणंगले) येथे आयोजित संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थीना अनुदान मंजुरीचे आदेश पत्र वाटप समारंभात ते बोलत होते. हुपरी, यळगूड, रेंदाळ, तळंदगे व रांगोळी आदी गावांतील २०० पात्र लाभार्थ्यांना यावेळी आमदार आवळे यांच्या हस्ते मंजुरीची पत्रे वितरित करण्यात आली.
संजय गांधी निराधार अनुदान समिती सदस्य कृष्णात मसुरकर म्हणाले समाजांतील गरजुना या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या कामात मंडल अधिकारी,गाव कामगार तलाठी यांच्यासह सर्वच शासकीय अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. गरजुंनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. संजय गांधी समितीचे सदस्य विजय गोरड, बाजीराव सातपुते, आप्पासो एडके यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मंडल अधिकारी, गाव कामगार तलाठी, कोतवाल तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका कॉंग्रेस उपाध्यक्ष किरण पोतदार, बाळासाहेब जाधव, प्रकाश मोरबाळे, शब्बीर कलांवत, शाहू म्हेत्रे, बाळासाहेब गायकवाड, प्रणिल मधाळे, राहुल घोडेस्वार आदी उपस्थित होते.
फोटो- हुपरी येथे आयोजित संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थीना अनुदान मंजुरीचे आदेश पत्र वाटप करताना आमदार राजू जयवंतराव आवळे. शेजारी कृष्णात मसुरकर, विजय गोरड, बाजीराव सातपुते, आप्पासो एडके, किरण पोतदार, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.