कोल्हापूर : ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’: कौशल इनामदार , अक्षरगप्पांचा शतकमहोत्सवी कार्यक्रमाला उंदड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 05:02 PM2018-01-23T17:02:53+5:302018-01-23T17:13:03+5:30
‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी’ या मराठी अभिमान गीताची आनंदयात्रा सोमवारी सांयकाळी येथील राम गणेश गडकरी सभागृहामध्ये रंगली.अक्षर दालन आणि निर्धार यांच्या तर्फे आयोजित अक्षरगप्पांच्या शताब्दीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोल्हापूर : ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी’ या मराठी अभिमान गीताची आनंदयात्रा सोमवारी सांयकाळी येथील राम गणेश गडकरी सभागृहामध्ये रंगली.
अक्षर दालन आणि निर्धार यांच्या तर्फे आयोजित अक्षरगप्पांच्या शताब्दीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषेविषयी आणि वास्तवाबाबत भाष्य करतानाच संगीतकार कौशल इनामदार यांनी त्यासाठी महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपण ही जबाबदारी पाड पाडली पाहिजे, असे आवाहन केले.
एका मोबाईल कंपनीला फोन केल्यानंतर त्यांनी आम्ही मराठीत बोलू शकत नसल्याचे मुंबईत सांगणे, एका रेडिओ वाहिनीने आम्ही मराठी गाणी लावत नाही असे स्पष्टपणे सांगितल्याने माझा स्वाभिमान दुखावला व त्यातूनच मराठी अभिमान गीताची कल्पना सूचल्याचे इनामदार यांनी सांगितले.
अक्षर दालन आणि निर्धार यांच्यातर्फे आयोजित अक्षरगप्पांच्या शताब्दीनिमित संगीतकार कौशल इनामदार यांचा सोमवारी येथील राम गणेश गडकरी सभागृहामध्ये मराठी अभिमान गीतांच्या कार्यक्रमाला श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.(छाया : आदित्य वेल्हाळ)
एकदा ही कल्पना सूचल्यानंतर दोन वर्षे यासाठी संशोधन आणि पाठपुरावा करीत तब्बल ११२ गायकांकडून हे गीत गाऊन घेतल्याचे सांगत त्यांनी या गीताच्या निर्मितीची चित्तरकथाच सांगितली. पुणे येथील मराठी साहित्य संमेलनात अमिताभ बच्चन यांनी या गीताच्या ओळी जाहीरपणे म्हटल्या. ही या अभिमान गीताला मोठी पावती दिल्याचे इनामदार यांनी सांगितले.
मराठी भाषा संपत चालली आहे, अशी ओरड करण्यापेक्षा तिचा वापर वाढविला पािहजे. ती जबाबदारी आपल्यावरच आहे, असे सांगत इनामदार यांनी यावेळी अनेक उदाहरणे दिली. अस्मिता पांडे यांनी मुलाखत घेतली, तर मंदार गोगटे यांनी तबला साथ केली.
यावेळी न्यू एज्युकेशन सोसायटीचे विनोदकुमार लोहिया, बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, सचिव दिलीप बापट, ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे, दिनेश वालावलकर, प्रा. भारत खराटे, राम देशपांडे, श्रीकांत नाईक, रजनी हिरळीकर, केशव स्वामी, सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. रवींद्र जोशी यांनी स्वागत, तर समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. मंजिरी जोशी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाला ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे, डॉ. धनंजय गुंडे, सोनाली नवांगूळ, अनुराधा गुरव, अरुणा देशपांडे, अनमोल कोठाडिया, प्रभाकर कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.