शासकीय योजनांचा लाभ ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहाेचविणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:22 AM2021-05-14T04:22:45+5:302021-05-14T04:22:45+5:30
कोल्हापूर : ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचे संघ, विविध संघटनांसाठी शासन विविध योजना तयार करीत आहे. या ...
कोल्हापूर : ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचे संघ, विविध संघटनांसाठी शासन विविध योजना तयार करीत आहे. या योजनांचा लाभ सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहाेचविणे गरजेचे आहे. ज्येष्ठांमध्ये याबाबत जागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ नागरिक अभ्यासक अरुण रोडे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार अधि विभागाच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प रोडे यांनी गुंफले. यावेळी आजीवन अध्ययन व विस्तार अधि विभागाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. ए. एम. गुरव उपस्थित होते.
राज्य व केंद्र शासन आज ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध योजना तयार करीत आहे. या योजना मूळ लाभार्थींपर्यंत पोहोचत नसल्यामुळे आणि काही वेळा होत असलेल्या शासकीय दिरंगाईमुळे या योजनांचा लाभ ज्येष्ठांना मिळत नाही. यासाठी जागृती करणे गरजेचे आहे. जागतिक पातळीवर ज्येष्ठ नागरिकांच्यासंदर्भात मोठे काम सुरू असून त्याचे प्रतिबिंब आज देशात व राज्यात उमटण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे केंद्र व राज्य शासन विविध उपक्रम हाती घेत आहे. या उपक्रमात स्थानिक संघटनांनी लक्ष घालून याचा अधिकाधिक ज्येष्ठांना लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. शासनाची धोरणे, कायदे व योजनांचा अभ्यास नसल्यामुळे अनेक समस्या येतात. या बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. यासाठी संघ व संघटना यांनी पुढाकार घ्यावा, असे रोडे यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांनी आपली बाल्यावस्था जोपासण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांनी केले.
अतुल एतावडेकर यांनी आभार मानले.
चौकट
मार्गदर्शनाची भूमिका
संघटनेमध्ये नव्या लोकांना अधिक संधी देऊन जुन्या सभासदांनी त्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका बजावणे गरजेचे आहे. नव्या सदस्यांनी प्रत्येक संघाच्या ठिकाणी ग्रंथालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन रोडे यांनी केले.