पलूसचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय ‘एनएसएस’मध्ये उत्कृष्ट
By admin | Published: June 19, 2017 05:21 PM2017-06-19T17:21:05+5:302017-06-19T17:21:05+5:30
राज्य शासनाचे पुरस्कार जाहीर; संगीता पाटील ‘सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी’, अमृता भंडारे ‘सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक’
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १९ : शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मधील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस)राज्यस्तरीय पुरस्कार शासनाने जाहीर केले आहेत. त्यात शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पलूस (सांगली) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने ‘सर्वोत्कृष्ट महाविद्यालया’चा पुरस्कार पटकविला आहे. या पुरस्काराचे स्वरुप स्मृतिचिन्ह आहे.
‘सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी’ पुरस्कार हा पलूस येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील डॉ. संगीता संपत पाटील यांनी मिळविला आहे. स्मृतिचिन्ह आणि पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ‘सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कारा’ची मानकरी शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागामधील अमृता अनिल भंडारे ठरली आहे. या पुरस्काराचे स्वरुप स्मृतिचिन्ह आणि दोन हजार रुपये असे आहे.
केंद्र सरकारच्या पद्धतीवर आधारित राज्यस्तरावर महाराष्ट्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षापासून एनएसएस अंतर्गत पुरस्कार देणे सन १९९३-९४ वर्षापासून सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यापीठांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेण्यात आला. त्यात एनएसएसच्या सन २०१६-१७ मध्ये नि:स्वार्थ, निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे. त्यांच्या नि:स्वार्थ सेवेचा गौरव करण्याच्यादृष्टीने राज्यस्तरीय पुरस्कार शासनाकडून दिले जातात. यावर्षीच्या पुरस्कारांची नावे एनएसएसचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंके यांनी दि. १७ जूनच्या शासन निर्णयाद्वारे जाहीर केली आहेत
सात गटांमध्ये पुुरस्कार सर्वोत्कृष्ट विद्यापीठ, कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम समन्वयक प्रशंसा प्रमाणपत्र, कार्यक्रम अधिकारी, महाविद्यालय, कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र आणि स्वयंसेवक या गटांमध्ये पुरस्कार वितरण होणार आहे. त्यात संस्था पातळीवरील पाच, तर वैयक्तिक स्वरुपातील ३१ पुरस्कारांचा समावेश आहे.