‘मराठा भवन’साठी सर्वोतोपरी प्रयत्न
By admin | Published: December 31, 2016 01:10 AM2016-12-31T01:10:05+5:302016-12-31T01:10:05+5:30
महापौर : मराठा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा; मुंबईतील मोर्चासाठी एक लाख मराठा जाणार : मुळीक
कोल्हापूर : मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मराठा महासंघ अग्रभागी आहे. त्यांच्या पुढाकाराने नियोजित असलेले ‘मराठा भवन’चे काम आपल्या कारकिर्दीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही महापौर हसिना फरास यांनी शुक्रवारी येथे दिली. याचवेळी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी कोल्हापुरातून एक लाख मराठा जाणार, असे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितले.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे मराठा महासंघातर्फे मराठा दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. प्रमुख उपस्थिती उपमहापौर अर्जुन माने, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम, विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, नियाज खान, बांधकाम व्यावसायिक जयेश कदम, कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, शाहू स्मारक ट्रस्टचे प्रशासनाधिकारी राजदीप सुर्वे, क्षत्रिय मराठा चेंबर्सचे अध्यक्ष विक्रांतसिंह कदम, महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक आदींची होती.
यावेळी महापौरांसह मान्यवरांच्या हस्ते ‘मराठा दिनदर्शिके’चे प्रकाशन करण्यात आले.
महापौर म्हणाल्या, मराठा दिनदर्शिका प्रकाशनाचा उपक्रम कौतुकास्पद असून, त्यासाठी शुभेच्छा आहेत. कोल्हापूर ही मराठ्यांची, पराक्रमी शिव-शाहूंच्या विचारांची भूमी आहे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मराठा महासंघ अग्रभागी आहे. त्यांच्या पुढाकाराने होत असलेल्या नियोजित मराठा भवनासाठी आपल्या कारकिर्दीत सर्वतोपरी प्रयत्न करू.
वसंतराव मुळीक म्हणाले, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मूक मोर्चे काढण्यात आले; परंतु एवढ्यावरच भागणार नाही. मागण्या मान्य
झाल्या नाहीत तर मुंबईतील मोर्चात कोल्हापूर अग्रभागी राहणार असून, यासाठी किमान एक लाख
मराठा जातील. या ठिकाणीही जर न्याय मिळाला नाही तर शांततेच्या मार्गाने ‘चक्का जाम’ आंदोलन केले जाईल.
प्रा. जयंत पाटील, संभाजी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. शिवाजीराव पाटील यांनी स्वागत केले. एकनाथ जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शशिकांत पाटील यांनी आभार मानले.
यावेळी डॉ. संदीप पाटील, उत्तम जाधव, डॉ. शिवाजीराव हिलगे, अजित राऊत, नितीन सावंत, अवधूत पाटील, मनोज नरके, मिलिंद ढवळे, आदी उपस्थित होते.
शहीद उलपे यांच्या मातोश्री झाल्या भावनिक
प्रकाशन सोहळ्यात पहिली दिनदर्शिका कसबा बावड्यातील शहीद जवान दिगंबर उलपे यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आली. यावेळी त्यांच्या मातोश्री आनंदी उलपे यांना व्यासपीठावर बोलाविण्यात आले. यानिमित्ताने शहीद जवान पुत्राच्या पराक्रमी आठवणींना पुन्हा उजाळा मिळाल्याने त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावून त्या काहीकाळ भावनिक झाल्या.