औद्योगिक सुरक्षा प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद
By admin | Published: March 10, 2016 11:11 PM2016-03-10T23:11:00+5:302016-03-10T23:59:30+5:30
घरडा केमिकल्स : कोल्हापूरच्या रस्ता निरीक्षकांनी केली पाहणी
आवाशी : घरडा केमिकल्सने आयोजित केलेल्या सुरक्षाविषयक प्रदर्शनाचा कंपनीतील अधिकारी, कामगार यांच्यासह ठेकेदारी पध्दतीवर काम करणारे कामगार व परिसरातील अन्य कंपन्यांच्या अधिकारी व कामगारवर्गानेही लाभ घेतला. सुरक्षा विभाग, कोल्हापूरचे रस्ता निरीक्षक अवसरे यांनीही प्रदर्शनाची पाहणी केली.
४ मार्च हा दिवस देशात ‘सुरक्षा सप्ताह दिन’ म्हणून साजरा केला जातो. लोटे- परशुराम औद्योगिक वसाहतीतही ४५ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह संपन्न होत आहे. औद्योगिक वसाहतीतील सर्व कंपन्यांच्या प्रवेशद्वारासमोर सुरक्षा सप्ताहाचे फलक लावण्यात आले आहेत. कंपनीत काम करताना सुरक्षा किती महत्वाची आहे, मद्यपान टाळता व रोखता कसे येऊ शकते याबाबतचा संदेश देण्याचा प्रयत्न यानिमित्त करण्यात आला आहे. मात्र, येथील घरडा केमिकल्स लि. या कंपनीचे व्यवस्थापन सतत काहीतरी नवे धडे देण्याचा प्रयत्न करत असते. याचाच भाग म्हणून कंपनी आवारात कारखान्यांमधून कशाप्रकारची अद्ययावत सुरक्षा यंत्रणा असायला हवी, याचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
यामध्ये आगीचा सामना करताना, रसायन गळती, फायर फायटींग, वायूगळती झाल्यास त्याची तत्पर माहिती, फोम गळती, फायर फायटींग, फोम, सेफ्टी गॉगल्स, हॅण्डग्लोव्हज्, हेल्मेट, सेफ्टी गणवेश, आदी दीडशेहून अधिक वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
कंपनीतील प्रदर्शनातच नव्हे तर ही सर्व यंत्रे कंपनीमध्ये कार्यान्वित असल्याचे कंपनीचे अधिकारी बेंडखळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या सर्व यंत्रांची किंमत ही लाखात असून, यामध्ये अमेरिकन बनावटीचे एकवेळ वापरता येणारे व आगीपासून वाचवणारे ब्लँकेट हे केवळ एक लाख रुपये किंमतीचे आहे.
डोंबिवली येथील एच. आर. मॅनेजर जे. के. पाटील यांनी काही गितांची रचना केली असून, ही गिते स्वत: गायलीही आहेत. ‘वाट बघतोय रिक्षावाला’ यासारख्या गीतांच्या चालीवर ही गिते रचली असून, घरडा कंपनीमध्ये सर्व अधिकारी व कामगार यांच्यासमोर या गितांचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी कोल्हापूरचे सुरक्षा निरीक्षक अवसारे, घरडा कंपनी व्यवस्थापक एस. के. गांधी, वरिष्ठ व्यवस्थापक अनिल भोसले, तन्वी रेडीज, यु. एस. व्ही. कंपनी सुरक्षा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक डांगे व सर्व अधिकारीवर्ग उपस्थित होता. यावर आधारित पथनाट्याचे बुधवारी चिपळूण येथील औद्योगिक सुरक्षा रॅलीमध्ये सादरीकरण करण्यात आले. (वार्ताहर)