‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान सुरू
By Admin | Published: February 4, 2015 12:18 AM2015-02-04T00:18:12+5:302015-02-04T00:41:50+5:30
जिल्ह्यात अंमलबजावणीला सुरूवात : शिक्षण आणि आरोग्य विभागाकडून जागृती
कोल्हापूर : मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी केंद्र सरकारचे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाची अंमलबजावणी शहर आणि जिल्ह्यात ७ जानेवारीपासून केली जात आहे. पहिल्या टप्प्यात शिक्षण आणि आरोग्य विभाग संयुक्तपणे जागृतीवर भर देत आहे.
केंद्र सरकारचे विभागीय प्रसिद्धी अधिकारी प्रमोद खंडागळे यांनी जिल्ह्यात सर्वांत कमी मुलींचा जन्मदर असलेल्या करवीर तालुक्यात प्रभावी जागृतीसाठी कार्यक्रम करण्यासंबंधीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार २३ फेब्रुवारीला करवीर तालुक्यातील सांगरूळ, तर २५ फेब्रुवारीला कसबा बीड येथे विशेष प्रचार मोहीम आणि कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत योजनांचीही माहिती दिली जाणार आहे. यानिमित्त शालेय व महाविद्यालयील विद्यार्थ्यांची जागृती फेरी निघणार आहे. लीड बँकेचे व्यवस्थापक मार्गदर्शन करतील.जिल्हा परिषद आरोग्य विभाग वाहनांवर चित्ररथ तयार करून गर्दीच्या ठिकाणी जागृती करत आहे. भीमा फेस्टिव्हलमध्येही ‘बेटी बचाओ’संबंधी संदेश देणारा हा चित्ररथ लक्षवेधी ठरला. आज, बुधवारपासून प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानात होणाऱ्या विभागीय बचत गटांच्या प्रदर्शनात चित्ररथ थांबविण्यात येणार आहे. प्रत्येक प्राथमिक आणि उपकेंद्रात महिन्यातील स्त्री आणि पुरुष जन्मदराची संख्या दर्शनी भागावर लावली जात आहे. महसूल विभागाच्या मदतीने अभियान व्यापकपणे राबविले जात आहे. शिक्षण विभाग एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये याकडे विशेष लक्ष देत आहे. सर्व मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत.