‘अच्छे दिन’च्या नावाने विश्वासघात : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:54 AM2018-06-13T00:54:12+5:302018-06-13T00:54:12+5:30
इचलकरंजी : भाजप सरकारने ‘अच्छे दिन’ ची घोषणा करीत जनतेचा विश्वासघात केला आहे. याचा बदला घेण्यासाठी लोक मतपेटीतून परिवर्तन घडवतील, असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मंगळवारी काढलेल्या सर्वपक्षीय मोर्चासमोर खासदार राजू शेट्टी बोलत होते. महात्मा गांधी पुतळ्यापासून निघालेल्या महागाईविरोधी मोर्चामध्ये भाजप वगळता शहरातील सर्व राजकीय पक्ष सहभागी झाले होते.
यावेळी राजू शेट्टी यांनी सर्व गट-तट विसरून भाजपच्या विरोधात राज्यात प्रथमच इचलकरंजीत मोर्चा निघाल्याबद्दल सहभागी झालेल्यांचे आभार मानले. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाही; म्हणून कर्जबाजारी शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत. याउलट जनतेला मात्र अन्नधान्य, खाद्यतेल महागाईच्या भावानेच मिळत आहेत. उद्योगधंदे बंद पडताहेत, कामगार बेरोजगार आणि शेतकरी तोट्यात अशी स्थिती भाजप सरकारच्या चार वर्षांतील आहे.
माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, भाजपने निवडणुकीवेळी लोकांना स्वप्न दाखविल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाच्या बॅँक खात्यात१५ लाख रुपये आले नाहीत; उलट गोरगरिबांचे रेशनिंगचे धान्य गायब झाले. वस्त्रोद्योगाची स्थिती बिकट झाली. यंत्रमागाची विक्री भंगाराच्या भावात सुरू आहे. उद्योगधंदे-शेतकरी-कामगार देशोधडीला लागले तरी सरकार ढिम्म आहे. त्यामुळे जनतेने आगामी निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवावी.
मोर्चासमोर बोलताना जनता दलाचे प्रदेश महासचिव प्रताप होगाडे यांनी भाजप सरकार सामान्य जनतेच्या खिशाची लूट करून बड्या उद्योगपतींची भर करीत असल्याचा आरोप केला. यावेळी दत्ता माने (माकप), मिश्रीलाल जाजू (राष्टÑवादी कामगार संघटना), मदन कारंडे (राष्टÑवादी कॉँग्रेस), महादेव गौड (शिवसेना), राजेंद्र निकम (मनसे), आदींनीही वाढत्या महागाईचा निषेध करीत सरकारवर टीका केली. त्यानंतर मोर्चाच्यावतीने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन दिले.
आता सुट्टी नाही : शेट्टी
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून खासदार शेट्टी म्हणाले, चंद्रकांत पाटील तुमच्या सरकारने घोर निराशा केली आहे. तुम्ही पाताळात जरी दडलात, तरी तुम्हाला हुडकून काढून जनता बदला घेईल. आता तुम्हाला सुट्टी नाही.
सवाल-जवाबचे आव्हान
इचलकरंजीच्या जनतेला पोकळ आश्वासने दिल्याचा आरोप करीत माजी मंत्री आवाडे यांनी जनतेच्या समस्या व निवडणूक काळातील आश्वासनांबाबत आमदार सुरेश हाळवणकर यांनी एकाच व्यासपीठावर येऊन सवाल-जवाब करण्याचे आव्हान दिले.