उत्तम संवाद हाच आत्महत्या रोखण्याचा चांगला पर्याय; आई-वडिलांची जबाबदारी मोठी : कुटुंबातील मालकीपणाची दहशत कमी होण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:04 AM2021-02-20T05:04:37+5:302021-02-20T05:04:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : प्रेमीयुगुल असो की विवाहिता अथवा अन्य कोणही, त्यांच्याशी आई-वडिलांचा, जवळच्या व्यक्तीचा उत्तम संवाद असेल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्रेमीयुगुल असो की विवाहिता अथवा अन्य कोणही, त्यांच्याशी आई-वडिलांचा, जवळच्या व्यक्तीचा उत्तम संवाद असेल आणि जरी आपली चूक झाली तरी आपले बाबा ती पोटात घालून मला माफ करतील, हा नात्याबद्दलचा विश्वास असेल, तर मुले आत्महत्येच्या मार्गाला जात नाहीत. कुटुंबात दहशत असते, त्यामुळे बोलायचे कुणाशी आणि कोण आपले ऐकून घेणार? अशी भावना बळावते, तेव्हाच टोकाचा मार्ग पत्करला जात असल्याचे अनेक घटनांतून पुढे आले आहे. मराठा समाजात पारंपरिक सरंजामदार वृत्ती अजूनही कमी झालेली नाही, हे देखील महत्त्वाचे कारण आहे.
करवीर तालुक्यात आणि पर्यायाने कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या गावातील एका प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून मागच्या दोन दिवसांत आत्महत्या केली. त्यानंतर तरुणाईच्या आत्महत्येचा प्रश्न नव्याने ऐरणीवर आला आहे. परीक्षेची भीती, नोकरी-व्यवसायातील अपयश, सासरमध्ये होणारा मानसिक त्रास, पती-पत्नीमध्ये लैंगिक संबंधांवरून निर्माण झालेला अविश्वास... अशा कारणांवरून आत्महत्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. कुणाच्याही मनात जेव्हा नैराश्याची भावना बळावत असते, ती कधी एका दिवसाची प्रक्रिया नसते. अशा काळात त्या व्यक्तीला कुणी तरी विश्वास देऊन त्यातून बाहेर काढणे आवश्यक असते. परंतु नात्यातील संवाद कमी झाल्याने थेट घटना घडल्यानंतरच आपण सारे जागे होतो, तेव्हा वाचवण्यासारखे आपल्या हातात काहीच नसते. करवीर तालुक्यातील ज्या प्रेमीयुगुलाने आत्महत्या केली, त्यांचे वय लहान होते. मुलगी बारावीत शिकत होती. तुझे प्रेम आहे ना, असू दे. परंतु आता तू बारावीच्या परीक्षेकडे लक्ष दे. चांगले शिक्षण होऊदे आणि मग तुझ्या लग्नाचे पाहू, असा विश्वास तिला दिला असता, तर कदाचित त्या दोघांनीही हे टोकाचे पाऊल उचलले नसते.
असेही एक कारण...
जी मुले प्रेमात पडतात ती कधीच आपल्या घरात त्याबद्दल सांगत नाहीत. असले काही घरात सांगायचे नसते, अशीच त्यांची मानसिकता तयार झालेली असते. या पातळीवरील मोकळेपणा कुटुंबात तयार झाला, तर प्रश्नाची उकल करणे सोपे होऊ शकते..
कुटुंबातील वडिलांची दहशत कमी होण्याची गरज
मला असली थेरं चालणार नाहीत... असला संवाद दरी निर्माण करतो.
जातीसाठी माती खाणारी औलाद आहे आमची... हा वृथा अभिमान नको.
पायातले पायताण पायातच बरे... ही भाषा अत्यंत अवमानास्पद.
घराण्याची प्रतिष्ठा आणि बायकांबद्दलचे मूर्ख समज कमी व्हायला हवेत.
आपण कुठं, ती कुठं? आपल्या पायरीला तरी बसते का ती...
आई-वडिलांनी सतत सर्वच बाबतीत मुलांशी बोलले पाहिजे. प्रेम, आकर्षण याबद्दल बोलणे, त्यासंदर्भातील संवेदनशील चित्रपट दाखविणे, तुला कुठला मुलगा-मुलगी आवडली तर आमच्याशी बोल, निखळ मैत्रीची परवानगी देणे आणि त्याचबरोबरच जबाबदारीचे भान सतत देत राहणे गरजेचे आहे.
- रसिया पडळकर
नव्या पिढीतील नाट्य कलावंत
मुले-मुली आत्महत्या करतात, त्यात त्या मुलांचा नव्हे, तर पालकांचाच जास्त दोष आहे असे मला वाटते. कारण ते मोकळेपणाने मुलांशी बोलत नाहीत. आपल्या मुलाने किंवा मुलीने कुणावर प्रेम करावे ही भावनाच त्यांना मान्य नसते. कारण मुलांमध्ये ते स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नव्हे तर मालकी हक्काच्या भावनेने पाहतात. शिक, नोकरी कर, मग आम्ही तुझ्या लग्नाचे पाहणार... अशा खुळ्या समजुती घट्ट रुतून बसल्या आहेत. त्यातून संवादाचा सेतू तयार होत नाही.
- तनुजा शिपूरकर
सचिव, महिला दक्षता समिती कोल्हापूर