‘बेटिंग बादशाह’ फरार
By Admin | Published: March 28, 2016 12:39 AM2016-03-28T00:39:32+5:302016-03-28T00:42:38+5:30
पोलिसांचा शोध सुरू : जामिनासाठी धडपड; कॉल डिटेल्सवरून महत्त्वपूर्ण पुरावे हाती
कोल्हापूर : क्रिकेट बेटिंग प्रकरणातील पंटरांनी नावे घेतल्याची चाहूल लागताच काही बुकीमालक मोबाईल बंद करून पसार झाले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुकीमालकांच्या घरी चौकशी केल्यानंतर कारवाईच्या भीतीने ते फरार झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. बेटिंगचे मुुख्य सूत्रधार महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव यांच्यासह काही बुकीमालकांचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासले. त्यामधून महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. जाधव यांच्यासह अन्य बुकीमालकांचे अटकपूर्व जामिनासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
शुक्रवारी रात्री पाकिस्तान विरुद्ध आॅस्ट्रेलिया क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणारे पंटर अमित बाळासाहेब बुकशेट (रा. जावडेकर कॉम्प्लेक्स, ताराबाई पार्क), तेजू ऊर्फ बंटी मोहन महाडिक (रा. मंगळवार पेठ) यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव यांच्यासह ठाकूर ऊर्फ प्रकाश बेला, शिवन (पूर्ण नाव माहीत नाही), रोहन परांडेकर, चेतन वरुटे, संतोष परमार, नितीन ओसवाल यांच्या सांगण्यावरून बेटिंग घेत असल्याची कबुली दिली होती. पोलिसांनी त्याच रात्री बुकीमालकांच्या घरी छापा टाकला असता ते सापडले नाहीत. पंटरांना अटक झाल्याचे समजताच ते फरार झाले. पोलिसांनी सभापती जाधव यांच्यासह अन्य संशयित बुकीमालकांचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासले आहेत. त्यामधून महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. कारवाईच्या भीतीने जाधव यांच्यासह अन्य बुकीमालकांनी अटकपूर्व जामिनासाठी वकिलांचे उंबरठे झिजवत पूर्ण तयारी केल्याचे सूत्रांनी सांगितले.