Kolhapur: यमगेत कोंबड्यांच्या झुंजीवर लाखोंचा सट्टा, सहाजणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 12:01 PM2024-02-27T12:01:53+5:302024-02-27T12:02:25+5:30
परजिल्ह्यांतील अडीचशेवर लोकांची उपस्थिती
मुरगूड : यमगे (ता. कागल) गावच्या हद्दीत वडाचा माळा येथे कोंबड्यांच्या झुंजी लावण्याचा प्रकार उघडकीस आला. या बेकायदेशीर झुंजी लावून त्यावर लाखो रुपयांचा सट्टा लावला जात होता. या खेळात आलिशान गाडीसह मोटारसायकल, टेम्पो आदी वाहनांतून परजिल्ह्यांतून अडीचशेवर लोक सहभागी झाले होते. कोल्हापूर आणि मुरगूड पोलिसांनी छापा टाकताच आपल्या गाड्या तिथेच टाकून अनेकांनी वाट दिसेल तिकडे सैरावैरा धावण्यास सुरुवात केली.
अधिक माहिती अशी, दुपारी बारापासून यमगेच्या हद्दीत वडाचा माळ या ठिकाणी वेगवेगळ्या गाडीतून अनेक तरुण येत होते. वस्तीपासून हे अंतर दूर असल्याने गावकऱ्यांना याबाबत काहीच माहिती नव्हती. सांगली, सातारा, पुणे आदी जिल्ह्यांतून आलेले तरुण मोठ्या प्रमाणात होते. अनेकांनी आलिशान गाड्यातून अगदी दोन ते पाच फुटांपर्यंत उंच कोंबडे आणले होते. या कोंबड्यांच्या झुंजी लावून मोठ्या प्रमाणात सट्टा लावला होता. प्रमुख आयोजक होते, ते विजयी कोंबडा मालकांना पाच ते दहा हजार बक्षीस देत होते. उपस्थित शौकीन यावर ठरावीक रक्कम सट्टा म्हणून लावत होते.
या झुंजीची माहिती सांगलीतील प्राणी मित्र अॅड. बसवराज हौसगोडर यांनी जिल्हा पोलिस व मुरगूड पोलिस यांना दिली. त्यानुसार दुपारी कोल्हापूर आणि मुरगूड पोलिसांनी घटनास्थळावर छापा टाकला. अचानक आलेल्या पोलिसांना पाहून झुंजीच्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. आयोजकांसह बघण्यासाठी व झुंजीवर सट्टा लावण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी गाड्या तिथेच टाकून रस्ता दिसेल तिकडे धावायला सुरुवात केली.
दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत मुरगूड पोलिस घटनास्थळी होते. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद सुरू होती.
मागील वर्षीही झुंजी
याच ठिकाणी गतवर्षीही अशाच कोंबड्यांच्या झुंजी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या झुंजी हौसेखातर होत नसून यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. एका प्रेक्षकाने या झुंजीवर एका दिवसात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, असे सांगितले.
मारामारी अन् गोळीबाराची चर्चा
एका झुंजीमध्ये विजयी झालेला कोंबडा काही वेळानंतर दुसऱ्या झुंजीला परत तोच ओळख लपवून आणला. यावर आक्षेप घेतल्याने वादावादी झाली यातून मारामारीही घडली, असे ग्रामस्थ सांगत होते. दरम्यान, गोळीबार झाल्याचा आवाजही अनेकांनी ऐकला असल्याचे सांगितले.
घटनास्थळावरील गाड्या गेल्या कोठे
पोलिसांनी छापा टाकल्यावर आपल्या गाड्या टाकून लोक पळून गेले होते, त्यामुळे सर्वच गाड्या जप्त होणे आवश्यक होते; पण प्रत्यक्षात कोणत्याच गाडीवर कारवाई झालेली दिसत नाही. पळून गेलेले काही वेळानंतर अर्थपूर्ण मध्यस्थी करत गाड्या घेऊन गेल्याची चर्चा सुरू होती.