‘फेसबुक’वरून पैशाची मागणी झाल्यास सावधान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:16 AM2021-06-10T04:16:53+5:302021-06-10T04:16:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सोशल मीडियाचा वापर वाढल्याने सायबर हॅकर्सकडून ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. विविध आमिषे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सोशल मीडियाचा वापर वाढल्याने सायबर हॅकर्सकडून ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. विविध आमिषे दाखवून अनेकांच्या बॅंक खात्यावरील रक्कम पळविण्याचे प्रकार घडत आहेत. ऑनलाईनच्या वापरकर्त्यांना गंडा घालण्यासाठी सायबर गुन्हेगार तयारीतच असतात. ‘फेसबुक’वरील असुरक्षित खाती शोधून त्यांचा ताबा मिळवणे, फ्रेंड लिस्टमधील मित्रांना त्याच्याच नावाने मेसेज पाठवला जातो व जमा रक्कम लुटली जाते. त्यामुळे असा मेसेज आल्यास रक्कम पाठविण्यापूर्वी ‘त्या’ आपल्या मित्राला फोन करून खात्री केल्यास फसवणुकीचे संकट टाळता येते.
सायबर गुन्हेगारांच्या बदलत्या गुन्हे पद्धतीचे पोलिसांसमोर आव्हानच आहे. सायबर सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून सायबर पेट्रोलिंगमुळे सायबर गुन्हेगारांवर नजर ठेवलेली असते. गेल्या महिन्यात शाहुपुरी पोलीस ठाण्यातील सायबर पोलिसांनी बॅंक अधिकाऱ्याची फेसबुकच्या माध्यमातून फसवलेली रक्कम २४ तासांत मिळवून दिली. पोलीस मुख्यालयातील सायबर पोलिसांचा नेहमीच सायबर गुन्हेगारीवर वॉच आहे.
- २०२०मध्ये पोलिसांकडील तक्रार अर्ज : ९७९ अर्ज
- फेसबुकवरून फसवल्याच्या तक्रारी : १३
परिचयातील व्यक्तीच्या नावाचा वापर
१) एखाद्या व्यक्तीचे फेसबुक अकाऊंटचे नाव, फोटो, शेअर केलेले फोटो त्याचे अकाऊंट हॅक करतात. ‘मी खूप गंभीर आजारी आहे, माझ्या अकाऊंटवर पैसे पाठवा’ अशाप्रकारचा मेजेस सायबर गुन्हेगारांकडून फेसबुकवरील खातेदाराच्या नावाने त्याच्याच वॉलवर टाकला गेला.
२) मूळ अकाऊंटधारकाचा अपघात झालाय, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले, पैसे संपलेत, आणखी पैशांची आवश्यकता आहे. तातडीने पैसे पुढील खात्यावर पाठवा, असा मेसेज वीज कर्मचाऱ्यांच्या फेसबुक अकाऊंटला हॅक करून त्याच्या फ्रेंड लिस्टवरील व्यक्तीच्या वॉलवर पाठवला.
३) खरेदीचे बिल भागवण्यासाठी उसने पैसे दे, ऑनलाईनवर पुढील खात्यावर ट्रान्सफर कर, असा मेसेज मूळ फेसबुक अकाऊंटधारकाचा हॅक करून त्याच्या फ्रेंड लिस्टवर पाठवला जातो, त्यातून गंडा घातला जातो.
अशी घ्यावी काळजी :
फेसबुकसह सोशल नेटवर्किंग ॲप वापरताना त्याची माहिती घेतली पाहिजे, त्याखेरीज न वापरलेले बरे. जर वापरत असाल तर सिक्युरिटी पासवर्ड स्ट्रॉग असावा. अल्फाबेटिक नंबर्स व स्पेशल कॅरेक्टरचा वापर असावा. हॅकर्सना पासवर्डचा अंदाज बांधता येत नाही. त्याशिवाय ‘टू स्टेप व्हेरिफिकेशन’मध्ये मोबाईल नंबर नोंदवून त्याद्वारे ओटीपी नंबर कार्यान्वित करावा. लॉग इन नोटिफिकेशन ऑन करावे, अशा पद्धतीने काळजी घेतल्यास हॅकर्सच्या नजरेतून आपण सुटताे.
कोट..
हॅकर्सकडून पुरुष व स्त्री यांना विरुद्धलिंगी आकर्षणाचा फायदा घेत मैत्रीचा फेसबुक प्रस्ताव पाठवला जातो, असे प्रस्ताव स्वीकारू नका. अकाऊंटची सुरक्षा तपासा, सेटिंग्जमध्ये प्रवेश करत आपल्या अकाऊंटच्या सुरक्षेसाठी ‘टर्न ऑन टू फॅक्टर ऑथिटिकेशन’ पर्याय वापरावा. स्ट्रॉग पासवर्ड असावा, आलेला ओटीपी इन्सर्ट करून खाते सुरक्षित ठेवावे. - श्रीकांत कंकाळ, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस