सावधान, ४३ गावांत पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:17 AM2021-07-15T04:17:51+5:302021-07-15T04:17:51+5:30
कोल्हापूर : पावसाळ्यात जलजन्य आजार होऊ नयेत म्हणून दरवर्षी जून महिन्यात आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने तपासले जातात. या वेळच्या ...
कोल्हापूर : पावसाळ्यात जलजन्य आजार होऊ नयेत म्हणून दरवर्षी जून महिन्यात आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने तपासले जातात. या वेळच्या अहवालात जिल्ह्यातील ४३ गावांतील पाणी दूषित असल्याचे समोर आले आहे. या गावांतील पिण्याचे पाणी आजारपणाचे कारण ठरू शकते, असे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे.
पिण्याचे पाणी दूषित, गढूळ झाल्यास गॅस्ट्रो, कावीळ, अतिसार, उलटी, पोटाचे विकार असे आजार होतात. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात या आजाराचे रुग्ण वाढत असतात. यावेळीही असेच चित्र आहे. यामुळे आरोग्य विभाग सतर्क राहून जनजागृती करीत आहे; पण कोरोनाची लाट अजूनही कायम असल्याने आरोग्य प्रशासनाचे इतर साथीचे आजार, जलजन्य आजार नियंत्रणात आणण्याकडे दुर्लक्ष होत आहे. जून महिन्यात घेण्यात आलेल्या पाणी नमुन्यात ४३ गावांत पिण्याचे पाणी दूषित असल्याचे समोर आले आहे.
१) किती नमुने घेतले तपासणीसाठी? - १०५३
किती गावांतील नमूने दूषित - ४३
२) तालुकानिहाय आढावा
तालुका नमुने घेतले दूषित नमुने आढळले
आजरा ६६ ०
भुदरगड ७७ ८
चंदगड १२२ ६
गडहिंग्लज १२८ ८
कागल ६० ४
हातकणंगले ९० ०
पन्हाळा ६५ ४
राधानगरी ७५ ०
शाहूवाडी १४९ ६
शिरोळ १२२ ३
करवीर ९१ ७
गगनबावडा ८ ०
३) शहरी भागात ४६ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य
गडहिंग्लज, शिरोळसह जिल्ह्यातील विविध शहरांत ४६ ठिकाणचे पिण्याचे पाणी दूषित आहे. त्याठिकाणी शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या सूचना भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या प्रशासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेस दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची यंत्रणा पाणी शुद्धीकरणासाठीची कार्यवाही करीत आहे.
४) अहवाल मिळण्यास विलंब
गावपातळीवर जलसुरक्षा रक्षक आणि आरोग्य सेवकांतर्फे पिण्याच्या पाण्याचे नमुने घेऊन जिल्हा, गडहिंग्लज, कोडोली, सोंळाकूर, शिरोळ येथील प्रयोगशाळेकडे पाठवले जाते. हे सर्व एकत्र करून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे पाठवले जाते. पण जूनचा अहवाल जि. प. प्रशासनाकडे मिळण्यास विलंब झाल्याने दूषित पाणी असलेल्या गावांत आवश्यक कार्यवाही करण्यास विलंब होणार आहे.
५) आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या !
पावसाळ्याचे दिवस आहेत. काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाण्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. यामुळे शक्यतो पावसाळा जाईपर्यंत पाणी उकळून प्यावे. जलजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी काळजी घ्यावी.
-डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी