‘भोगावती’ शाखेचे व्यवस्थापक देवर्डेकर निलंबित : शेतकरी संघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 04:56 PM2019-11-07T16:56:00+5:302019-11-07T17:00:10+5:30
शेतकरी सहकारी संघाच्या भोगावती शाखेचे व्यवस्थापक देवर्डेकर यांना व्यवस्थापनाने निलंबित केले. एका खासगी कंपनीला संचालक मंडळाची परवानगी न घेता परस्पर डिझेलची विक्री केल्याने ही कारवाई करण्यात आली. शिरोळ शाखेतही खत विक्रीचा असाच प्रकार घडला होता, तोपर्यंत या शाखेत प्रकार घडल्याने संघाची तपासणी यंत्रणा नेमकी काय करते? असा प्रश्न सभासदांतून विचारला जात आहे.
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या भोगावती शाखेचे व्यवस्थापक देवर्डेकर यांना व्यवस्थापनाने निलंबित केले. एका खासगी कंपनीला संचालक मंडळाची परवानगी न घेता परस्पर डिझेलची विक्री केल्याने ही कारवाई करण्यात आली. शिरोळ शाखेतही खत विक्रीचा असाच प्रकार घडला होता, तोपर्यंत या शाखेत प्रकार घडल्याने संघाची तपासणी यंत्रणा नेमकी काय करते? असा प्रश्न सभासदांतून विचारला जात आहे.
गेल्या वर्षभरात संघाच्या विविध शाखांत अपहाराचे प्रकार उघडकीस आले. चार-पाच महिन्यांपूर्वी शिरोळ शाखेत व्यवस्थापकांसह तेथील यंत्रणेने खताची कर्नाटकात विक्री केल्याचे दाखवून तब्बल ३९ लाखांचा अपहार केला होता. निरीक्षक व मुख्य व्यवस्थापक दर महिन्याला स्टॉक तपासत असताना उधारीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात मालाची विक्री होतेच कशी? असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला होता. हे प्रकरण अद्याप ताजे असताना संघाच्या भोगावती शाखेत उधारीवर माल विक्रीचे प्रकरण पुढे आले आहे.
वास्तविक डिझेल व पेट्रोल उधारीवर विक्री करायची नाही, हे संघाचे धोरण असताना त्याला बाजूला सारत तेथील व्यवस्थापक देवर्डेकर यांनी तब्बल १८ लाखांचे डिझेल एका खासगी कंपनीस विक्री केले आहे. ही कंपनी तेथील कारखान्याची डिस्टलरी प्रकल्प चालवित आहे. या कंपनीस उधारीवर डिझेल दिले असून, गेली पाच-सहा महिने एक रुपयाही कंपनीने संघास दिलेला नाही.
वास्तविक उधारीवर विक्री करायची नाही, हे संघाचे धोरण होते. संघाची यंत्रणा दर महिन्याला माल खरेदी व विक्रीचा ठोकताळा घेते. मग ही उधारी संबंधित यंत्रणेला कशी दिसली नाही. हाच प्रश्न पुन्हा उपस्थित होत असून, या सगळ्या प्रकरणात संपूर्ण यंत्रणाच सहभागी आहे की काय? अशी विचारणा सभासदांमधून होत आहे.
भोगावती शाखेत देवर्डेकरांनी संचालक मंडळाची मंजुरी न घेताच उधारीवर डिझेलची विक्री केली. त्याबद्दल त्यांना निलंबित केले असून, संबंधित कंपनीने १८ लाख अधिक व्याज देण्याची तयारी दर्शविली आहे.
- अमरसिंह माने,
अध्यक्ष, शेतकरी संघ