ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांना भाई माधवराव बागल पुरस्कार जाहीर
By संदीप आडनाईक | Published: May 24, 2024 05:14 PM2024-05-24T17:14:18+5:302024-05-24T17:14:55+5:30
कोल्हापूर : भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे त्यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. २८ मे रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात ...
कोल्हापूर : भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे त्यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. २८ मे रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यंदाचा पुरस्कार नाशिक येथील ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत निरंजन टकले यांना जाहीर झाल्याची माहिती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. टी. एस. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
बागल विद्यापीठाच्या शाहुपुरी येथील कार्याालयात ही घोषणा करण्यात आली. यावेळी व्यंकाप्पा भोसले, शंकर कांबळे, रवि जाधव, संभाजी जगदाळे, अनिल घाटगे, जितेंद्र कांबळे उपस्थित होते. यावेळी भाई माधवराव बागल यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. २८ मे रोजी सकाळी ९.३० वाजता शाहू मिल समोरील भाई बागल यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता शाहू स्मारक भवन येथे यंदाचा सन २०२४ या वर्षाचा भाई माधवराव बागल पुरस्कार नाशिक येथील ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत निरंजन टकले यांना शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आहेत. शाल, फेटा, गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, पुष्पहार आणि रोख पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
जस्टिस लोया यांच्या मृत्यूचे गूढ, कोपार्डी खटल्यातील अल्पवयीन मुलीचा झालेला खून, अ लॅम्ब सायनाईज्ड ही सावरकर यांच्यावरील शोधकथा, महात्मा गांधीजींच्या रेल्वे भारत यात्रेवरील स्टोरी, त्याच मार्गावरील १४००० किलोमीटरचा प्रवास करुन सिक्रेट्स ऑफ 'एम'पायर, द वीकमधून गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांचा लाखो रुपयांचा घोटाळा अशी अभ्यासपूर्ण लेखमालेची शोधपत्रकारिता त्यांनी केली. कांदा माफिया, अनवाँटेड इंडियन्स असे त्यांचे इतर महत्वाचे लेख गाजले आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. या प्रभावी निर्भय बनो व्यक्तिमत्वाची यावर्षीच्या बागल पुरस्कारासाठी बागल विद्यापीठाने निवड केली असल्याची माहिती डॉ. टी. एस. पाटील यांनी दिली.