भाई वैद्य यांना ‘शाहू’ पुरस्कार कोल्हापुरात शुक्रवारी वितरण

By admin | Published: June 23, 2015 12:59 AM2015-06-23T00:59:33+5:302015-06-23T00:59:33+5:30

गेल्या ७० वर्षांपासून सामाजिक चळवळीत कार्यरत असलेल्या भाई वैद्य यांनी जातीव्यवस्था, सामाजिक अन्याय व विषमता, राजकीय दडपशाही व वंचितांवरील अन्यायाविरुद्ध संघर्ष केला.

Bhai Vaidya gets 'Shahu' award in Kolhapur Friday | भाई वैद्य यांना ‘शाहू’ पुरस्कार कोल्हापुरात शुक्रवारी वितरण

भाई वैद्य यांना ‘शाहू’ पुरस्कार कोल्हापुरात शुक्रवारी वितरण

Next

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा राजर्षी शाहू पुरस्कार यंदा ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांना देण्यात येणार आहे. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. रोख रक्कम एक लाख रुपये व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आतापर्यंतचा हा तिसावा पुरस्कार आहे.शाहू महाराजांच्या जयंतीदिनी म्हणजेच शुक्रवारी (दि.२६) संध्याकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवनमध्ये ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील.
गेल्या ७० वर्षांपासून सामाजिक चळवळीत कार्यरत असलेल्या भाई वैद्य यांनी जातीव्यवस्था, सामाजिक अन्याय व विषमता, राजकीय दडपशाही व वंचितांवरील अन्यायाविरुद्ध संघर्ष केला. विद्यार्थीदशेतच १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत सहभाग घेतल्यानंतर ते १९४३ मध्ये राष्ट्रसेवा दलात सामील झाले. सामाजिक कार्यासाठी त्यांना १९६० मध्ये ‘युनेस्को’ची शिष्यवृत्ती मिळाली. या काळात त्यांनी गोवामुक्ती चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महागाईविरोधी चळवळीत भाग घेतला. ते १९६२ मध्ये डॉ. राममनोहर लोहिया यांच्या समाजवादी पक्षात सामील ते त्यांच्या फावडा, तुरुंग व मतपेटी या तत्त्वानुसार आचरण केले. या कालावधीत ते २५ वेळा तुरुंगात गेले. ते १९६२ ते ७७ या काळात महापालिकेचे सदस्य होते, १९७४-७५ मध्ये पुण्याचे महापौर होते. त्याचवर्षी ते अखिल भारतीय महापौर परिषदेचे अध्यक्ष झाले. १९७८ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले त्याचवर्षी पुलोद सरकारमध्ये गृहराज्यमंत्री होते. त्यानंतर ते जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर यांच्या भारत यात्रेत सामील झाले. राष्ट्रसेवा दल, समाजवादी जनपरिषद व भारत यात्रा ट्रस्टचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले व समाजप्रबोधनाचे कार्य चालू ठेवले.
भार्इंना त्यांच्या कार्याबद्दल गोवा क्रांतीदिन पुरस्कार, मौलाना आझाद सद्भावना पुरस्कार, समता भूषण पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आजवर केलेल्या कार्याचा विचार करून यावर्षीचा शाहू पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे. परिषदेस डॉ. अशोक चौसाळकर, पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे उपस्थित होते.


यापूर्वीचे मानकरी...
महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात या पुरस्काराला खूप मोलाचे स्थान आहे. आजपर्यंत हा पुरस्कार भाई माधवराव बागल, वि. वा. शिरवाडकर, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, प्रा. एन. डी. पाटील, आशा भोसले, मायावती, गोविंद पानसरे, प्राचार्य पी. बी. पाटील, शंकरराव खरात, आदी मान्यवरांना देण्यात आला आहे.

Web Title: Bhai Vaidya gets 'Shahu' award in Kolhapur Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.