कलाकार मानधनासाठी भजनवाले, वारकरीही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:45 AM2017-07-21T00:45:22+5:302017-07-21T00:45:22+5:30
निवड समिती पेचात : कलेचा निकष नसल्याने मंजुरीसाठी भरमसाट अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कलाकारांच्या मानधनासाठी दोन वर्षांचे १२० प्रस्ताव मंजूर करावयाचे असताना प्रत्यक्षात ६२५ अर्ज आले आहेत. हे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कलेचा निकष नसल्याने जिल्ह्यातील भजनाला जाणाऱ्यांनीही मानधनासाठी अर्ज केले आहेत; त्यामुळे निवड समितीच पेचात पडली आहे.
समाजकल्याण विभागाच्या वतीने प्रतिवर्षी ६० कलाकारांचे मानधनासाठी प्रस्ताव मंजूर केले जातात. राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवर कलाप्रदर्शन केलेल्या कलाकारांना अनुक्रमे २१००, १५०० आणि ११०० रुपये मानधन दिले जाते. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संबंधित कलाकाराला आणि त्याच्या निधनानंतर त्याच्या पत्नीला किंवा पतीला हे मानधन सुरू राहते.
गेल्या दोन वर्षांत समाजकल्याण विभागाकडे ६२५ प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यांपैकी १२० प्रस्ताव मंजूर करून द्यावयाचे आहेत. यासाठी आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कलाकारांची १ मिनिटभरासाठी कला पाहून त्यांच्या प्रस्तावाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे; परंतु यामध्ये जाणारा वेळ पाहता, हा प्रस्तावही बारगळण्याची शक्यता आहे.
तालुक्याला जाऊन कलाचाचणी अव्यवहार्य
अर्ज केलेले खरोखरच कलाकार आहेत का, हे पाहण्यासाठी तालुक्याला जाऊन तेथे संबंधितांना बोलावून एक मिनिटाची कला पाहून मग निर्णय घेण्याची कल्पना निवड समितीसमोर आहे; परंतु १२ तालुक्यांत जाऊन सर्वांना तालुक्याला बोलावून चाचणी घेणे अव्यवहार्य वाटते. ८७ वर्षांच्या कलाकारानेही मानधनासाठी अर्ज केला आहे. साठी ओलांडलेले आता समितीसमोर कशी कला सादर करणार, हा प्रश्न आहे.
वारकऱ्यांचेही अर्ज
ज्यांनी २० वर्षांपेक्षा अधिक काळ कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची भूमिका पार पाडली आहे, अशा कलाकारांना यामध्ये प्राधान्य आहे. परंतु, ‘जिल्हा परिषद सदस्य आपल्यातीलच आहे. मिळाले तर मिळाले,’ असे करीत भजनासाठी जाणाऱ्यांनी, पेटी, मृदंग, टाळ वाजवणाऱ्यांनीही अर्ज केले आहेत. एवढेच नव्हे तर पंढरपूरला वारीला गेलेल्या वारकऱ्यांचेही अर्ज आहेत.
स्पष्ट कलानिकष नसल्याने गोंधळ
कोणत्या प्रकारच्या कलेमधील कलाकारांना हे मानधन द्यावयाचे आहे, याची स्पष्टता शासन आदेशात नाही. त्यामुळे गावात मंदिरात भजनाला जाणाऱ्यांनीही या मानधनासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळेच प्रस्तावांची संख्या वाढली आहे.
सर्व प्रस्तावांची छाननी केली आहे. निकषांच्या अधीन राहून प्रस्ताव मंजूर केले जातील. येत्या पंधरा दिवसांत समिती सदस्यांशी चर्चा करून त्यासाठी निश्चित धोरण आखून नावे निश्चित केली जातील.
- वैशाली नायकवडे, अध्यक्ष, कलाकार निवड समिती