मुरगूडच्या नगराध्यक्षपदी भांदिगरे
By admin | Published: April 28, 2016 12:43 AM2016-04-28T00:43:31+5:302016-04-28T00:59:06+5:30
पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी कागलचे तहसीलदार शांताराम सांगडे होते.
मुरगूड : मुरगूड (ता. कागल) येथील नगराध्यक्षपदी पाटील गटाच्या नम्रता नामदेव भांदिगरे यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. रेखा सुधीर सावर्डेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदावर निवड करण्यासाठी पालिकेच्या सभागृहामध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी कागलचे तहसीलदार शांताराम सांगडे होते.
मुरगूड नगर परिषदेवर पाटील गट व राष्ट्रवादी काँग्रेस यांची संयुक्त सत्ता आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी मागास वर्गीय महिलेसाठी आरक्षण पडल्याने या प्रवर्गातील फुलाबाई कांबळे व गौराबाई सोनुले यांना प्रत्येकी सव्वा वर्ष नगराध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली. उर्वरित अडीच वर्षांसाठी पुन्हा खुल्या गटातील महिलेसाठी आरक्षण पडले.
यावेळी आमदार हसन मुश्रीफ, ‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील, बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी या प्रवर्गातील सर्व महिला सदस्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रथम माया चौगले, वसुधा कुंभार, रेखा सावर्डेकर यांना प्रत्येकी सात-सात महिने काम करण्याची संधी दिली.
ठरलेल्या फार्मुल्यानुसार या प्रवर्गातील नम्रता भांदिगरे यांना राहिलेल्या कालावधीसाठी संधी मिळणार होती. त्यानुसार नेत्यांच्या आदेशान्वये पाटील गटाच्या नम्रता नामदेव भांदिगरे यांनी या पदासाठी एकमेव अर्ज दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे तहसीलदार सांगडे यांनी जाहीर करताच भांदिगरे समर्थक व पाटील गटाच्या समर्थकांनी डॉल्बी लावून, गुलाल उधळून व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात आनंद साजरा केला.
यावेळी नूतन नगराध्यक्षा नम्रता भांदिगरे यांचा माजी नगराध्यक्षा रेखा सावर्डेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, उपनगराध्यक्ष अजितसिंह पाटील,
माजी नगराध्यक्षा रेखा सावर्डेकर, संतोष वंडकर, नामदेव भांदिगरे, माया चौगले, वसुधा कुंभार, फुलाबाई कांबळे, गौराबाई सोनुले, दगडू शेणवी, शिवाजी इंदलकर, बजरंग सोनुले, सुनील चौगले, सुधीर सावर्डेकर, जगन्नाथ पुजारी, बटू जाधव, मुख्याधिकारी बी. एस. जगताप, प्रकाश पोतदार, जयवंत गोधडे, अमर कांबळे, रणजित निंबाळकर, दिलीप कांबळे, आदी प्रमुख उपस्थित होते.