ओंजळभर पाण्यासाठी पायाला भिंगरी

By admin | Published: May 3, 2016 12:05 AM2016-05-03T00:05:47+5:302016-05-03T00:43:17+5:30

म्हासुर्ली खोरा तहानलेलाच : मातीचे बंधारे कोरडे; शेतकरी हवालदिल

Bhangari found on water for the whole water | ओंजळभर पाण्यासाठी पायाला भिंगरी

ओंजळभर पाण्यासाठी पायाला भिंगरी

Next

महेश आठल्ये --म्हासुर्ली --मातीचे बंधारे घालून साठवून ठेवलेले पाणी संपल्याने तसेच जंगलातील झरे आटल्याने संपूर्ण धामणी खोऱ्यात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. नागरिकांना घागरभर पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. परिणामी, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, शेतातील पिके वाळून गेली आहेत. जिल्ह्यातील अन्य नद्यांच्या खोऱ्यात उपसाबंदी लागू आहे. धामणीच्या पात्रात सध्या जे.सी.बी.द्वारे खड्डे मारून पाणी मिळविण्याची लगबग सुरू असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.
धामणी खोऱ्यातील तीन तालुक्यांत विभागलेल्या सुमारे ५० ते ६० वाड्यावस्त्यांच्या पाचविलाच पाणीटंचाई पुजली आहे. दरवर्षी धामणीच्या पात्रात गरजेनुसार स्वखर्चाने व श्रमदानाने मातीचे बंधारे घालून पाणी अडवून ठेवले जाते व नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाईवर केविलवाणी मात केली जाते. दरवर्षी मार्चपर्यंत पाणी कसेबसे पुरते. यावर्षी मात्र चार महिने मुबलक पाऊस पडणाऱ्या खोऱ्यावर निसर्गाने अवकृपा केल्याने अवघा आठ दिवस पाऊस पडला. परिणामी, यावर्षीची पाणीटंचाई भीषण आहे. नदीपात्र महिन्यापूर्वीच कोरडे पडले आहे. जंगलातील झऱ्यांचे पाणीही आटल्याने वन्यप्राण्यांसह नागरिकांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पिण्याच पाण्यासह शेतातील पिके वाळून गेली असून, या टंचाईकाळात शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेती व्यवसाय आतबट्ट्यात असून, दूध धंदाही पाणी आणि वैरणीमुळे बंद पडत आला आहे.
म्हासुर्ली मुख्य गाव व वाड्यावस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. नदीच आटल्याने दोन-दोन जॅकवेल असतानाही येथे गेले १४ दिवस पाण्याचा पत्ता नाही. आस्वलवाडी, झाणवाडी, जोगमवाडी व धनगरवाड्यावर घागरभर पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत आहे. पाण्याच्या वाटण्या कराव्या लागत आहेत. कोतोली, गवशी या गावांतीलही नदी आटल्याने अशीच अवस्था असून, गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे, खेरिवडे, शेळोशी, जर्गी, बावेली, कडवे, आदी गावांतील वाड्यावस्त्यांवर असणारे झरे आटले असून, सायफन योजना बंद पडल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. कूपनलिकाही आटल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पन्हाळा तालुक्यातील पणोरे, वेतवडे, गोगवे, कोदवडे परिसरातील कळे धरणातून बॅकवॉटरने पाणी आंबर्डेपर्यंत आणल्याने या परिसरात पाणीटंचाईच्या झळा कमी जाणवत असल्या तरी मुबलक पाणी दुर्मीळच आहे.


धामणीवासीयांच्या आशा पुन्हा पल्लवित
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर धामणी प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा प्रश्न पुन्हा पुन्हा ऐरणीवर येत आहे. या प्रकरणाच्या पूर्णत्वाशिवाय या खोऱ्यातील ५० ते ६० वाड्यावस्त्यांवर विकासाची गंगा पोहोचणार नाही. या खोऱ्यातील जनतेने प्रकल्प पूर्णत्वासाठी दोन महिन्यांपूर्वी विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढून सरकारचे लक्ष वेधले होते. त्याचाच परिणाम म्हणून जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी म्हासुर्ली येथे भेट देऊन या प्रश्नावर गांभीर्याने मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने धामणीवासीयांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

म्हासुर्ली-झापावाडी (ता. राधानगरी) येथे जंगलातील झऱ्यावर पाण्यासाठी झालेली गर्दी.

Web Title: Bhangari found on water for the whole water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.