जन्मापासून अंथरुणावर खिळून असलेल्या प्रथमेशची भरारी, दहावीत ८० टक्के गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 06:46 PM2020-07-29T18:46:23+5:302020-07-29T18:47:55+5:30
जन्मल्यापासून तो सेरेब्रल पाल्सी या विकाराने त्रस्त आहे. त्यामुळे तेव्हापासूनच अंथरुणावर खिळून असतानाही दहावीच्या परीक्षेत स्वत:ची जिद्द व आईवडिलांच्या प्रयत्नांमुळे प्रथमेश दत्तात्रय वाले या विद्यार्थ्याने लखलखीत यश मिळविले. त्याला दहावीत ७९.४० टक्के गुण मिळाले आहेत.
कोल्हापूर : जन्मल्यापासून तो सेरेब्रल पाल्सी या विकाराने त्रस्त आहे. त्यामुळे तेव्हापासूनच अंथरुणावर खिळून असतानाही दहावीच्या परीक्षेत स्वत:ची जिद्द व आईवडिलांच्या प्रयत्नांमुळे प्रथमेश दत्तात्रय वाले या विद्यार्थ्याने लखलखीत यश मिळविले. त्याला दहावीत ७९.४० टक्के गुण मिळाले आहेत.
उत्तम शिक्षण घेऊन त्याने स्वावलंबी जीवन जगावे, अशी अपेक्षा त्याच्या पालकांनी व्यक्त केली आहे. तो जुन्या मोरे कॉलनीतील सोमराज कॉम्प्लेक्समध्ये राहतो. निकाल ऐकल्यानंतर प्रथमेश कमालीचा आनंदित झाला.
आयुष्यात कशातही थोडे अपयश आले तर नैराश्यातून चुकीच्या वाट चोखाळणाऱ्यांना प्रथमेशचे आयुष्य प्रेरणादायी आहे. त्याला आजही अंथरुणावरून उठून बसवावे लागते. त्याचे वडील घरगुती वायरिंगचा व्यवसाय करतात. कामाचा रोजचा व्याप सांभाळून ते रोज त्याला गाडीवरून शाळेत सोडत होते.
आई दुपारी जाऊन त्याचे नैसर्गिक विधी आवरून येत असे. परत सायंकाळी जाऊन त्याला गाडीवरून घरी आणावे लागे. परंतु हे करताना आई स्वप्ना यांच्यासह वाले कुटुंबीयांना त्याचे कधीच ओझे वाटले नाही. त्यांचे कुटुंब मोठे आहे, सर्वांचा मोठा आधार असल्याने प्रत्येकानेच प्रथमेशला फुलू देण्यास मदत केली. त्यांचा कोणताही घरगुती समारंभ असो; त्यात प्रथमेश नाही असे कधीच झाले नाही. त्यामुळेच त्याची जडणघडण चांगली झाली आहे. त्याच्या यशाचे गमक त्यामध्येच आहे.
प्रथमेशचा शाळेतही मित्रपरिवार आहे. त्यांना आपल्या निकालापेक्षा प्रथमेशच्या यशाचा आनंद जास्त वाटला. वर्गशिक्षक बी. एम. फडतरे, मुख्याध्यापक भीमराव गोसावी यांच्यासह शाळेतील शिपायांपासून सर्वांनीच त्याच्या शिक्षणासाठी सहकार्य केले; त्यामुळेच त्याची धडपड कारणी लागल्याची भावना वडिलांनी बोलून दाखवली. प्रथमेश विद्यापीठ कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणार आहे.
तीन शस्त्रक्रिया
प्रथमेशच्या आतापर्यंत मोठ्या तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. दहावी परीक्षेच्या तोंडावरच तो कॉटवरून खाली पडला आणि उजवा पाय मांडीतूनच मोडला. तशाही अवस्थेत त्याने अभ्यास केला व लेखनिक घेऊन परीक्षा दिली.
प्रथमेशच्या पालकांनी सुरुवातीपासूनच त्याच्यावर चांगले उपचार होतील यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यासाठी महिन्याकाठी त्यांना किमान पंधरा हजार रुपये खर्च येत असे; परंतु मुलगा चांगला व्हावा यासाठी त्यांनी हा खर्च केला आहे.