अमित शाह केंद्रीय गृहमंत्री की पुजारी?; शरद पवारांचा टोला, उद्धव ठाकरेंचीही घेतली बाजू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 07:40 AM2023-01-09T07:40:25+5:302023-01-09T07:40:33+5:30

महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र असल्याचाही केला दावा

'Bharat Jodo' Yatra Big Help for Unity of Opposition; NCP Chief Sharad Pawar's opinion | अमित शाह केंद्रीय गृहमंत्री की पुजारी?; शरद पवारांचा टोला, उद्धव ठाकरेंचीही घेतली बाजू

अमित शाह केंद्रीय गृहमंत्री की पुजारी?; शरद पवारांचा टोला, उद्धव ठाकरेंचीही घेतली बाजू

Next

कोल्हापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला सर्वसामान्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे देशभरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकत्र येण्यासाठी या यात्रेची मदत होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ते कोल्हापूरमध्ये रविवारी सकाळी पत्रकारांशी बोलत होते.

पवार म्हणाले, भारत जोडो यात्रेवरही टीका झाली परंतु राहुल गांधींची यात्रा केवळ काँग्रेसपुरती राहिली नाही. महाराष्ट्रात जयंत पाटील, सुप्रिया सुळे त्यात सहभागी झाले. गांधी विचार मानणाऱ्या संस्था, संघटनाही सहभागी झाल्या. सामान्यांनी या पदयात्रेला चांगला प्रतिसाद दिल्याने भाजपने त्यांच्याविषयी केलेल्या दूषित वातावरणाला चांगले उत्तर मिळाले.

राज्यातील आरोप-प्रत्यारोपांचा दर्जा घसरला आहे. तो टाळण्यासाठी सुप्रिया सुळे या देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहेत. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, हे काही थांबणार नाही. परंतु, सत्तेवर आल्यानंतर पाय जमिनीवर हवेत. तुरूंगात घालीन, जामीन रद्द करतो ही राजकीय नेत्यांची भूमिका असू शकत नाही. कोणीही टोकाची भूमिका घेणे योग्य नाही.  

राज्यपालांविषयी नाखूशच

महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी आम्हीही नाखूश असून, उत्तम राज्यपालांची महाराष्ट्राला परंपरा होती. परंतु हे असे पहिले राज्यपाल आहेत की, ज्यांनी सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यांनी पदाची प्रतिष्ठा राखली नाही, अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली. 

पवार म्हणाले....

सीमाप्रश्नी उत्तम वकील देऊन सर्वोच्च न्यायालयात मजबूतपणे बाजू मांडण्याची गरज.
जातनिहाय गणना व्हावी, ही आमचीही मागणी. नितीशकुमार यांचे याबद्दल अभिनंदन.
सरकार पाडण्यासाठी संजय राऊत यांनी काही नियोजन केले का, याची माहिती घेतो.
संभाजीराजे यांना स्वराज्यरक्षक म्हणण्यात काहीही चुकीचे नाही.
महाविकास  आघाडीला रिपब्लिकन पक्षाच्या काही गटांसह इतरांना सोबत घेऊन निवडणुका लढविण्यात फारशी अडचण येणार नाही.

कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत 

जरी उद्धव ठाकरे यांच्यापासून काहीजण बाजूला गेले असले तरी कडवा, प्रत्यक्षात काम करणारा शिवसैनिक ठाकरे यांच्याबरोबरच असल्याचे माझे निरीक्षण आहे. याला कोल्हापूरही अपवाद नाही. त्यामुळे जे खासदार, आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आहेत, त्यांना येणाऱ्या निवडणुकांवेळी जनतेच्या भावना काय आहेत हे लक्षात येईल, असे पवार यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री की पुजारी?

राम मंदिर कधी बांधून पूर्ण होणार, हे पुजाऱ्यांनी सांगणे अपेक्षित असताना त्यांचे काम केंद्रीय गृहमंत्री करत आहेत, असा टोलाही पवार यांनी अमित शहा यांना लगावला.

Web Title: 'Bharat Jodo' Yatra Big Help for Unity of Opposition; NCP Chief Sharad Pawar's opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.