शाहूंच्या भूमीत 'भीमरायांना' अभिवादन, बिंदू चौकात रात्री बारा वाजता हजारो अनुयायांनी केले वंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 11:51 AM2022-04-14T11:51:35+5:302022-04-14T12:09:40+5:30
कोल्हापूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो..च्या जयघोषात हजारो अनुयायांनी येथील बिंदू चौक परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास रात्री बारा वाजता अभिवादन ...
कोल्हापूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो..च्या जयघोषात हजारो अनुयायांनी येथील बिंदू चौक परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास रात्री बारा वाजता अभिवादन केले. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी महिला, पुरुष, अबालवृद्ध मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी बाबासाहेबांचा एकच जयघोष करण्यात आला. विविध मान्यवरांनी, संघटनांनी यावेळी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करुन वंदन केले. अभिवादन केल्यानंतर याठिकाणी मोठी आतिषबाजी करण्यात आली.
कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी सरकारने सर्व निर्बध शिथील केल्यामुळे यंदा आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. अनेक तरुण मंडळे भीमज्योत आणण्यासाठी महाड, कोल्हापुरातील माणगांव येथे रवाना झाले होते. त्यामुळे महामार्गावरुन अनेक तरुण भीमज्योत घेवून परत येत होते. तर, अनेक ठिकाणी रात्री बारा वाजताही विविध कार्यक्रम, डॉल्बीच्या ठेक्यावर तरुणांनी जल्लोष केला.
आज, गुरुवारी दिवसभर व्याख्यान, पुरस्कार वितरण, मिरवणुका, आदी विविध कार्यक्रम होणार आहेत. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने दोन वर्षांनी सार्वजनिकरित्या जयंती साजरी करता येणार असल्याने कोल्हापुरातील संस्था, संघटना, नागरिकांनी जय्यत तयारी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. याअंतर्गत बिंदू चौकात गुरुवारी सकाळी अभिवादनाचा, तर सायंकाळी सहा वाजता भीमगीत सादरीकरणाचा कार्यक्रम होईल.
सिध्दार्थनगर उत्सव कमिटीतर्फे दुपारी चार वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे. दसरा चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, शनिवार पेठ, बुधवार पेठ, सिद्धार्थनगर असा मिरवणुकीचा मार्ग आहे. त्यात विविध संस्था-संघटना, मंडळे, नागरिक सहभागी होतात.
राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टीतर्फे बिंदू चौकात सायंकाळी साडेसहा वाजता बुध्द-भीमगीतांचा कार्यक्रम होईल. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे सायंकाळी सहा वाजता शाहू स्मारक भवन येथे ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांचे डॉ. आंबेडकर व गांधीजी, संवाद समन्वयाचे नवे पैलू या विषयावर व्याख्यान होईल. माजी खासदार एस. के. डिगे मेमोरियल फौंडेशनतर्फे भीम फेस्टिव्हलअंतर्गत बुधवारी समाजरत्न भीमक्रांती पुरस्कारांचे वितरण झाले. धम्मचक्र बुद्धविहार संस्था, भारतनगर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे वाचन संगिती उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत पाच हजार लोकांनी एकाचवेळी महामानवाच्या पुस्तकांचे वाचन केले.
शहरातील गंजीमाळ, सुधाकर जोशीनगर, सिध्दार्थनगर, विचारेमाळ, कनाननगर या परिसरांसह जिल्ह्यातील गावोगावी जयंती उत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी केली आहे. विचारेमाळ, गौतम राजगृह हौसिंग सोसायटी, आंबेडकर कॉलनी, सिध्दार्थनगर परिसरात उत्साहात जयंती साजरी केली जाणार आहे. विचारेमाळ परिसरातून सायंकाळी मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक राजू लाटकर यांनी सांगितले.
मध्यवर्ती समितीची मिरवणूक २४ एप्रिलरोजी
जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीतर्फे दि. २४ एप्रिलरोजी दुपारी चार वाजता बिंदू चौकातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामध्ये शहरासह ग्रामीण भागातील नागरिक सहभागी होणार असल्याचे उत्सव समितीचे समन्वयक उत्तम कांबळे यांनी बुधवारी सांगितले.