भाऊसिंगची रोडवरील व्यापारी संकुलाबाबत अनास्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:27 AM2021-09-05T04:27:32+5:302021-09-05T04:27:32+5:30
कोल्हापूर : कधी एकदा जिल्हा परिषदेचा, शासनाचा निधी येतो. याची वाट पाहायची. नेहमीप्रमाणे रस्ते, ...
कोल्हापूर : कधी एकदा जिल्हा परिषदेचा, शासनाचा निधी येतो. याची वाट पाहायची. नेहमीप्रमाणे रस्ते, गटारीची कामे करायची. त्याचे कंत्राटदारही ठरलेले. काही कामे दुसऱ्याच्या नावावर आपणच घ्यायची. सर्वसाधारण सभेत जोरदार भाषणे करायची. मात्र भाऊसिंगजी रोडवरील व्यापार संकुलाबाबत मात्र इच्छाशक्तीचा अभाव असल्याने या सभागृहाची मुदत संपण्याची वेळ आली तरी याबाबत फारशा हालचाली दिसत नाहीत.
कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोडवर १३ हजार ६७० चौरस फुटांची जिल्हा परिषदेची जागा आहे. या ठिकाणी सध्या गाळे आहेत. परंतु या ठिकाणी उभारण्यात येणारे संभाव्य व्यापारी संकुल शाश्वत उत्पन्न मिळवून देणारे आहे. याबाबत गेले २० वर्षे चर्चा सुरू आहे. शौमिका महाडिक अध्यक्ष असताना त्यांनी तत्कालिन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास यांच्याकडे हा विषय सोपवला होता. त्यांनी विद्यमान गाळेधारकांशी सकारात्मक चर्चा करून हा विषय पुढे नेला. न्यायालयीन पातळीवरही समझोता करण्यात आला.
या इमारतीच्या बांधकामासाठी बांधकाम परवाना फी पोटी दोन वर्षांपूर्वीच १ कोटी २७ लाख रुपये भरण्यात आले आहेत. सध्याची इमारत निर्लेखन करण्यासाठी २ लाख ८३ रुपये खर्च येणार असून दुकान गाळेधारकांसाठी तात्पुरते पत्र्याचे दुकानगाळे यासाठी १४ लाख रुपये खर्च येणार आहे. परंतु गेल्या दीड वर्षात यात पुढे काही झालेले नाही. जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढले पाहिजे, अशी भाषणे चढ्या आवाजात केली जातात. परंतु जिल्हा परिषदेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे पदाधिकाऱ्यांंचेच दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे.
चौकट
व्यापारी संकुलाची वैशिष्ट्ये
२० चारचाकी गाड्या पार्किंगची सुविधा
लाेअर ग्राऊंड फ्लोअरवर १० दुकानगाळे आणि २१ दुचाकी गाड्यांचे पार्किंगची सोय
अप्पर ग्राऊंड फ्लोअरवर १० गाळे आणि ३ चारचाकी, १८ दुचाकी पार्किंगची सोय
पहिल्या मजल्यावर व्यावसायिक वापरासाठी ३१०.७४ चौ. मी. जागा उपलब्ध
दुसऱ्या मजल्यावर ३५४.२१ चौ. मी. जागा उपलब्ध
तिसऱ्या मजल्यावर ३५४.२१ चौ. मी. जागा उपलब्ध
या बांधकामासाठी १३ कोटी खर्च अपेक्षित
चौकट
ग्रामविकासमंत्री असताना अडचण कशाची...
राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. असे असूनही जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात या विषयाकडे लक्षच दिले नाही. जिल्हा परिषदेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यासाठी मुश्रीफ नाही म्हणणार नाहीत. अशी परिस्थिती असताना इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे जाणवते.
कोट
या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती घेतली आहे. महापालिकेने आणखी काही रक्कम भरण्याबाबत पत्र दिले आहे. येणाऱ्या दोन महिन्यांत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सहकार्याने हा व्यापारी संकुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.